हजारो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळवून देणार – अमोल केंद्रे
दिवा \ आरती परब : दिवा शहरातील खासगी शाळांकडून घेतल्या जाणाऱ्या अनधिकृत डोनेशन व मनमानी शुल्कवाढीच्या विरोधात धडाकेबाज युवा प्रतिष्ठानने जोरदार भूमिका घेतली असून, “नो डोनेशन – नो फी” हे अभियान राबवून दिव्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळवून देण्याचा संकल्प संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे यांनी व्यक्त केला आहे.
दिव्यातील अनेक खासगी शाळा शासनाकडून अनुदान घेत असूनही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून डोनेशन, फी आणि इतर शुल्कांच्या नावाखाली आर्थिक बोजा टाकत असल्याचा आरोप केंद्रे यांनी केला. अनुदान मिळणाऱ्या शाळांनी नियमांनुसार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे आवश्यक असताना त्या सवलती पालकांना नाकारल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर दिव्यातील अनुदानित व अनुदान नसलेल्या सर्व खासगी शाळांचे ऑडिट कधी झाले, कोणत्या आधारावर झाले आणि जर ऑडिट नसेल तर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच शाळांची इमारत अनधिकृत असल्यास परवानगी देणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवरही कारवाई व्हावी, कारण दुर्घटना किंवा जीवितहानीची जबाबदारी शालेय व्यवस्थापनावर राहणार असल्याचे केंद्रे यांनी नमूद केले.
अनुदान घेणाऱ्या शाळांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय सुविधांची माहिती देणारे फलक शाळेबाहेर लावणे बंधनकारक करावे, अशी मागणीही केंद्रे यांनी निवेदनातून केली. यामुळे शिक्षणाच्या नावाने दिवा शहरात सुरू असलेला काळाबाजार थांबेल आणि पालकांवरील आर्थिक शोषणाला आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या अभियानामुळे दिव्यातील विद्यार्थ्यांना कोणतेही डोनेशन न देता, कोणतेही जादा शुल्क न भरता, मोफत आणि नियमबद्ध शिक्षण मिळणार असल्याचा निर्धार धडाकेबाज युवा प्रतिष्ठानने केला आहे.
