Loksabha Election : लोकसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार ?

Maharashtra WebNews
0


 नवी दिल्ली : संपूर्ण देशातील राजकीय पक्षांचे लक्ष लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे. भाजप आणि कॉंग्रेस पक्षाने आपले उमेदवार देखील जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांची तारीख १० मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती.  त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाने लोकसभा निवडणुकीची सगळी तयारी पूर्ण केली आहे. निवडणूकपूर्व बैठकांची फेरी सुरू असून या फेऱ्या १३ मार्चपर्यंत संपूर्ण होतील त्यानंतर कधीही निवडणुका जाहीर होऊ शकतात. यावेळीही सार्वत्रिक निवडणुका सात-आठ टप्प्यात होऊ शकतात.या निवडणुकीत सुमारे ९७ कोटी मतदार मतदानासाठी पात्र ठरणार आहेत. 

आयोगाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाचा विविध राज्यांचा दौरा पूर्ण झाला आहे. आयोग ११ ते १३ मार्च दरम्यान जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी निवडणूक आयोग राज्यात कधीही निवडणुका जाहीर करू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांची निवृत्ती आणि अरुण गोयल यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेली रिक्त पदे भरण्यासाठी १५ मार्चपर्यंत भरली जातील अशी शक्यता आहे.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांची तारीख १० मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या. तर २३ मे रोजी मतमोजणी पार पडली होती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बोर्डाच्या परीक्षा, सण आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची उपलब्धता लक्षात घेऊन निवडणुकीच्या तारखा ठरवल्या जात आहेत. निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिताही लागू होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. 


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)