आयुक्त सौरव राव यांची अविनाश जाधव यांनी घेतली भेट
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) च्या सहा उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी उमेदवारांचे अर्ज कपटनितीने बाद करण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे. या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील तसेच प्रभाग क्रमांक ५ मधील अधिकारी सत्वशिला शिंदे यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत मनसे नेते अविनाश जाधव यांनी मंगळवारी ठाणे महापालिकेचे आयुक्त व मुख्य निवडणूक अधिकारी सौरव राव यांची भेट घेतली.
या वादग्रस्त अधिकाऱ्यांवर २४ तासांत कारवाई न झाल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. आयुक्तांनी याबाबत योग्य कारवाईचे आश्वासन दिले असले, तरी कारवाई झाली नाही तर माहिती अधिकाराच्या माध्यमातून या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचा निर्धार अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.
प्रभाग क्रमांक १८ मध्ये मनसेसह अन्य प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज सत्ताधाऱ्यांशी संगनमत करून बाद करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी पोलिस यंत्रणेचा दबाव टाकण्यात आल्याचे चित्रिकरण जाहीरपणे प्रदर्शित करण्यात आले होते. या बिनविरोध निवडीतील कथित गैरप्रकारांबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून न्यायालयात याचिकाही सादर करण्यात आली आहे. मात्र, अद्याप संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, यावर मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“जर हा बिनविरोध निवडींचा ट्रेंड असाच सुरू राहिला, तर पुढच्या टप्प्यात महापौरसुद्धा बिनविरोध बसतील,” अशी तीव्र टीका अविनाश जाधव यांनी केली. या निषेधार्थ त्यांनी आयुक्तांना २४ तासांचा अल्टीमेटम दिला असून, कारवाई न झाल्यास २५व्या तासाला आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
भाजप-शिवसेना महायुतीने मंगळवारी जाहीर केलेल्या वचननाम्यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपरोधिक टीका केली. “महायुतीने त्यांच्या वचननाम्यात स्पष्टपणे रेटकार्ड जाहीर करावे.
अपक्ष उमेदवाराला ५० लाख, शिवसेना उमेदवाराला २ कोटी, मनसे उमेदवाराला ३ कोटी, काँग्रेस उमेदवाराला ५० लाख इतकेच नव्हे, पुढील निवडणुकीच्या वचननाम्यात कोणत्या उमेदवाराला किती पैसे देण्यात आले, हेही नमूद करावे. तसे झाले तरच ती खरी ‘प्रगतशील’ भारतीय जनता पार्टी ठरेल,” असा टोलाही अविनाश जाधव यांनी लगावला.

