मोबाईल गहाळप्रकरणी शाहूपुरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

 


२१ मोबाईल हस्तगत; ३.१५ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

कोल्हापूर \ शेखर धोंगडे : शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने शहरातील गर्दीच्या ठिकाणी गहाळ व चोरीस गेलेल्या मोबाईल प्रकरणांचा यशस्वी छडा लावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एस.टी. स्टँड, रेल्वे स्टेशन, भाजी मार्केट आदी ठिकाणी नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे एकूण २१ मोबाईल हॅन्डसेट तांत्रिक माहितीच्या आधारे शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.

 पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार, पोलीस उप अधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष डोके व सतीश होडगर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने सायबर तांत्रिक माहितीचा वापर करत गहाळ मोबाईलचे ट्रेसिंग केले.




शोधून काढलेले सर्व मोबाईल पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून मूळ मालकांना परत देण्यात आले, त्यामुळे संबंधित नागरिकांनी पोलीस प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, अतिश म्हेत्रे तसेच अंमलदार मिलिंद बांगर, रविकुमार आंबेकर, भैरू माने, सनिराज पाटील, सुशिलकुमार गायकवाड, महेश पाटील, राहुल पाटील, अमोल पाटील, बाबासो ढाकणे, कृष्णात पाटील, अमर आडसुळे, रविंद्र पाटील यांनी मोलाचे योगदान दिले. शहरात मोबाईल गहाळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना शाहूपुरी पोलिसांनी दाखवलेली तत्परता व तांत्रिक दक्षता नागरिकांच्या दृष्टीने दिलासादायक ठरली असून, या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





Post a Comment

Previous Post Next Post