नवी मुंबईत रिक्षांवर बॅनर्सद्वारे मतदान जनजागृती



नवी मुंबई : १५ जानेवारी रोजी होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी महापालिका व निवडणूक विभागामार्फत विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत शहरातील विविध समाजघटकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून रिक्षाचालकांशी थेट संवाद साधत मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत रिक्षाचालकांना लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क स्वतः तसेच कुटुंबीय व मित्रपरिवाराने नक्की बजावावा, असे आवाहन करण्यात आले. मतदानाचे कर्तव्य पार पाडूनही रोजचे काम करता येते, त्यामुळे कोणीही मतदान टाळू नये, असे रिक्षाचालकांना सांगण्यात आले. यावेळी १ ते २७ प्रभागांमध्ये ४ जागांसाठी व २८ व्या प्रभागात ३ जागांसाठी बहुसदस्यीय पद्धतीने मतदान कसे करायचे, याची सविस्तर माहिती देण्यात आली. मतदान प्रक्रियेबाबत रिक्षाचालकांच्या मनातील शंकांचे समाधानही करण्यात आले.




तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५०० हून अधिक रिक्षांच्या पाठीमागील बाजूस ‘१५ जानेवारी रोजी मतदान करा’ असा संदेश असलेले फलक लावण्यात आले आहेत. रिक्षांच्या दोन्ही बाजूंच्या पॅनलवर बहुसदस्यीय पद्धतीत मतदान कसे करायचे, याची चित्रात्मक माहिती निवडणूक यंत्राच्या छायाचित्रांसह बॅनर स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत स्वीप उपक्रमातून संपूर्ण महापालिका क्षेत्रात व्यापक मतदान जनजागृती राबवली जात असून, बहुसदस्यीय पॅनल पद्धतीविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे.





Post a Comment

Previous Post Next Post