एसबीआयचा अहवाल जाहीर
नवी दिल्ली: कोरोना काळानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने चमकदार कामगिरी केल्याचा अहवाल भारतीय स्टेट बॅंकेने जाहीर केला आहे. एसबीआयच्या अहवालानुसार कोरोनानंतर जीडीपीचा वास्तविक सरासरी वाढीचा दर ८.१ टक्क्यांवर पोहोचला, जो कोविड-१९ कालावधीपूर्वीच्या ५.७ टक्क्यांपेक्षा खूपच जास्त आहे. SBI च्या ताज्या अहवालानुसार, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत कोरोना कालावधीनंतर ते आतापर्यंत २३५ आधार अंकांची वाढ झाली आहे. या वाढीमध्ये महाराष्ट्राने ५६ बेसिस पॉइंट्स आणि उत्तर प्रदेशने ४० बेसिस पॉइंट्सचे योगदान दिले, जे राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. भारतीय जीडीपीच्या या वाढीमध्ये इतर राज्यांचे योगदान ९० बेसिस पॉइंट्स होते.
अहवालानुसार, गुजरातने सकल राज्य देशांतर्गत उत्पादनात (GSDP) दुपटीने वाढ केली आहे. हे गेल्या दशकात २.२ पट वाढीपेक्षा अधिक आहे. यानंतर, कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, सिक्कीम आणि मध्य प्रदेश ही राज्ये महत्त्वपूर्ण आर्थिक योजना आणि विकासात योगदान देत आहेत.
एसबीआयच्या अहवालात अनेक राज्यांतील दरडोई उत्पन्नातही वाढ झाल्याचा उल्लेख आहे. या आघाडीवर गुजरातमध्ये सर्वाधिक १.९ पट वाढ झाली आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत गुजरातशिवाय कर्नाटक आणि तेलंगणा यांनीही इतर राज्यांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. यामुळे आर्थिक आघाडीवर या राज्यांची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.
उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि मध्य प्रदेश यासारख्या काही राज्यांमध्ये दरडोई उत्पन्नातील वाढ स्थिर राहिली. झारखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली आणि गोवा या राज्यांमध्ये दरडोई उत्पन्नात घट झाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.