गणेशोत्सवासाठी जास्तीच्या आरक्षित, अनारक्षित गाड्या सोडा,

 


आमदार राजू पाटील यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

दिवा, (आरती मुळीक परब): गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे सह उपनगरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या खुप जास्त असते. परंतु कोकणातील चाकरमान्यांना दरवर्षी रेल्वेने कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या तिकिटांसाठी तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही एकाही रेल्वे गाडीत कोकण वासियांना तिकीट उपलब्ध होत नसल्याने कोकण वासियांची निराशा झाली आहे. त्यामुळे कोकण वासियांसाठी विशेष आरक्षित आणि अनारक्षित गाडया सोडून दिलासा देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे.

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची कोकणात जाण्यासाठी तीन ते चार महिने आधीच तयारी सुरु होते. त्यासाठी आरक्षित तिकिटे काढण्याची धावपळ होते. रेल्वे कडून ही गणेशोत्सवाची तिकिटे काढण्यासाठी सुरुवात होते. पण मात्र यंदाही कोकणची वाट बिकटच ठरणार असल्याचे चाकरमान्यांचे म्हणणे आहे. गणरायाच्या आगमनाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गाड्यांची तिकीट फुल्ल झाली आहेत. त्यामुळे सध्या कोकण वासियांसमोर गावी जाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकणाच जाणाऱ्या चाकरमान्यांच्या व्यथा मनसे आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे मांडल्या आहेत. गेल्या वर्षी प्रमाणे गौरी गणपती दरम्यान सर्व गाड्या फुल्ल झाल्या असून एकही गाडीमधील प्रतीक्षा यादीत तिकीट उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. कोकणात गणपती उत्सवानिमित्त जाणारे चाकरमानी तिकीटासाठी रात्रभर रांगा लावून असतात. परंतु तिकिटे नाहीत कारण रेल्वे आरक्षण पूर्णपणे दलालांच्या ताब्यात गेलं आहे, असा हल्ला बोला आमदार पाटील यांनी केला आहे.

दरवर्षी रेल्वेकडून तिकिटींची दलाली करणाऱ्या दलालांवर कारवाई केली जाते. प्रत्यक्षात योग्य अशी कारवाई होत नसल्याने दलालांनी सर्व रेल्वे आरक्षणावर ताबा मिळवल्याचे दिसत आहे. त्यामुळे गौरी गणपतीनिमित्त आताच नवीन विशेष गाड्यांचे नियोजन करावं, असे आमदार राजू पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, दिवा, पनवेल, मुंबई सेंट्रल, वसई येथून सर्वाधिक आरक्षित आणि अनारक्षित गाड्या सोडून कोकण वासियांना दिलासा देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आमदार राजू पाटील यांच्या पत्रानंतर आता रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्व कोकण वासियांच्या नजरा लागल्या आहेत.

कल्याण ग्रामीण - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गौरी गणपती दरम्यानच्या सर्व गाड्या फुल झाल्या आहेत. एकाही गाडीमधील प्रतिक्षा यादीमध्येही उपलब्ध होणारे तिकीट दिसत नाही. कोकणात जाणारे बांधव हे रात्रभर तिकिटासाठी उभे राहतात पण त्यांना तिकीट मिळत नाही कारण रेल्वे आरक्षण पूर्णपणे दलालांच्या ताब्यात आहे. दरवर्षी या दलालांवर फक्त कारवाईचा फार्स केला जातो पण प्रत्यक्षात कारवाई मात्र काहीच होत नाही. 

- प्रमोद(राजू) रतन पाटील, आमदार 




Post a Comment

Previous Post Next Post