पुणे : सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र दाभोलकर यांची २०१३ मध्ये हत्या करण्यात आली होती. पुण्यातील विशेष न्यायालयाने शूक्रवारी या प्रकरणी निकाल दिला. दाभोळकर यांची हत्या करणाऱ्या पाचपैकी दोन आरोपी दोषी आढळले. त्यामुळे इतर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २०१४ मध्ये या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने २०१६ मध्ये आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला अकरा वर्षांनंतर पुण्यातील विशेष UAPA न्यायालयातील सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) पी.पी. जाधव यांनी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद काळसकर या दोन आरोपींना जन्मठेप आणि पाच लाखाच्या दंडाची शिक्षा सुनावली, तर तिघांची निर्दोष मुक्तता केली.
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) च्या म्हणण्यानुसार अंदुरे आणि काळसकर यांनी दाभोलकरांवर गोळीबार केला होता. न्यायालयाने आरोपी कान-नाक-घसा (ENT) सर्जन वीरेंद्रसिंह तावडे, मुंबईस्थित वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. खटल्यादरम्यान, फिर्यादी पक्षाने २० साक्षीदारांची चौकशी केली तर बचाव पक्षाने दोन साक्षीदारांची चौकशी केली. फिर्यादी पक्षाने आपल्या अंतिम युक्तिवादात दाभोलकरांच्या अंधश्रद्धेविरुद्धच्या मोहिमेला आरोपींचा विरोध असल्याचे म्हटले.
दाभोलकर हत्या प्रकरणात सनातनच्या अनुयायांचे निर्दोषत्व सिद्ध झाले आहे, असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी सांगितले. या प्रकरणाबाबत सनातनला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू होते, ते एकप्रकारे उद्ध्वस्त झाले आहे. दाभोलकरांची हत्या झाली त्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यामागे हिंदू धर्मांधांचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या एका वक्तव्यानंतर हिंदू संघटना आणि सनातन संघटनांची चौकशी सुरू झाली. हिंदू धर्मियांना गोवण्याचा प्रयत्न झाला. आज न्यायालयाच्या निर्णयाने सनातन संस्थेचे निर्दोषत्व सिद्ध झाले आहे.
