रस्ता रोको करून विचारणार आरटीओला जाब
डोंबिवली (शंकर रिक्षाचालकांच्या समस्येसाठी भाजपचे लाक्षणिक उपोषण ) : डोंबिवली शहराचा विसर पडलेल्या कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभाग ( आरटीओ ) रिक्षाचालकांच्या समस्येवर कानाडोळा करत असल्याचे दिसते. याबाबत भाजप रिक्षाचालक - मालक संघटनेचे आवाज उठविला असून वारंवार सांगूनही आरटीओने कानाडोळा केला. अखेर संघटनेचे अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी कल्याण आरटीओच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात सोमवारी ८ जुलै रोजी पूर्वेकडील इंदिरा चौक येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व कल्याण शीळ रस्ता भागाजी वझे चौक येथे रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत भाजप रिक्षाचालक - मालक संघटनेचे अध्यक्ष दत्ता माळेकर म्हणाले,कल्याण आरटीओचे अधिकारी यांच्यासोबत दूरध्वनीवरून बऱ्याच वेळा चर्चा केली. रिक्षाचालकांच्या अडचणी समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. तरीही रिक्षा चालकांची कामे होत नाही. नियमात शासनाची फी भरून सर्व कागदपत्रे सादर केली असता अधिकारी वर्गाकडून टाळाटाळ करण्यात येते. एक अधिकारी असताना रिक्षाचालकांची कामे होत होती. आता एक आरटीओ, दोन अे आरटीओ असतानाही रिक्षाचालकांची कामे करण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येते. अधिकाऱ्यांच्या मलाईदार खाते वाटाघाटी मध्ये सर्वसामान्य नागरिक व रिक्षाचालक भरडल्या जात आहे.
वारंवार अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देखील ते जाणून-बुजून या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. म्हणून कल्याण आरटीओच्या विरोधामध्ये सोमवारी ८ तारखेला इंदिरा गांधी चौका येथे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तर कल्याण शीळ रस्ता भागाजी वझे चौक येथे रस्ता रोको करण्यात येणार आहे, याधी ३० जानेवारी २०२३ रोजी कल्याण आरटीओच्या विरोधामध्ये अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या नागरिक व रिक्षाचालकांच्या पिळवणुकीबाबत एक दिवशीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले होते. नागरिकांची व रिक्षाचालकांची कशी लूट कल्याण आरटीओकडून करण्यात येते, याचा दर फलक ही लावण्यात आला होता.