नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ या खेळाच्या महाकुंभाला आता फक्त काही दिवस उरले आहेत. २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताने या स्पर्धेसाठी ११७ खेळाडूंची निवड केली आहे. भारतीय खेळाडू भारताला सर्वाधिक पदके मिळवून देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय खेळाडूंची कारकिर्द बहरण्यासाठी ८.५ कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून बोर्ड आयओएला ८.५ कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा केली. जय शाह यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 'मला जाहीर करताना अभिमान वाटतो की BCCI पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय खेळाडूंना पाठिंबा देईल.
१९ दिवस चालणाऱ्या या मेगा इव्हेंटमध्ये ३२ खेळांच्या ३२९ स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांमध्ये जगभरातून १०,५०० खेळाडू सहभागी होणार आहेत. याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतातील ११९ खेळाडूंनी भाग घेतला होता, ज्यांनी ७ पदके जिंकली होती. यामध्ये भालाफेकमध्ये नीरज चोप्राने जिंकलेल्या ऐतिहासिक सुवर्णपदकाचा समावेश आहे.

