अंबरनाथ : भारताच्या व विशेषत: महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या आणि प्रदीर्घ कालावधी लोटून गेल्यावरसुद्धा इतिहासातील महत्त्वाच्या घटनांशी थेट दुवा जोडणाऱ्या ऐतिहासिक नाणी आणि शस्त्रांचे प्रदर्शन अंबरनाथ नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या प्रयत्नाने स्वतंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर दि. १३ आणि १४ ऑगस्ट रोजी अंबरनाथ नगरपरिषदेतर्फे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन अंबरनाथ नगरपरिषदेत दि. १३ व १४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते सायं ०७.०० वाजेपर्यंत असणार आहे.
या प्रदर्शनात शिवप्रेमींना ऐतिहासिक शिवकालीन दांडपट्टे, धोप, मुल्हेरी मुठीची तलवार, तेगा, उना, गोलिया पद्धतीची तलवार, मराठा कट्यार, विजयनगर कट्यार, बिचवा, खंजीर, अडकित्ता, कर्द, खंजराली, गुप्ती, माडू,परशु, धनुष्यबाण, भाले, विटा, सांग, तोफगोळे, जुने कुलूप त्याचबरोबर २५०० वर्षांपूर्वीची प्राचीन आहत नाणी, पंचमार्क नाणी, सातवाहनांची नाणी, देवगिरी आणि विजयनगर साम्राज्यातील नाणी, श्री शिव छत्रपती,श्री शंभू छत्रपती, श्री राजाराम छत्रपती आणि श्री शाहू महाराज (सातारा) यांची दुर्मिळ नाणी तसेच मराठा साम्राज्यातील दुर्मिळ चांदीची नाणी आणि संस्थानिकांची नाणी पहायला आणि अभ्यासायला मिळणार आहेत.
शहरातील सर्व लहान मोठ्या नागरिकांसाठी व परिसरातील अभ्यासू, शिवप्रेमी, इतिहासप्रेमी व्यक्तींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सदर प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी केले आहे.