नवी मुंबईत एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 


महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते प्रारंभ

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभर राबविण्यात येत असलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारी सीबीडी बेलापूर येथील नागरी आरोग्य केंद्रात महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणारी एचपीव्ही लस महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये मुलींसाठी मोफत उपलब्ध करण्यात आली आहे.


केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय पातळीवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून त्याच अनुषंगाने नवी मुंबईतही या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.


या कार्यक्रमास आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका स्वाती गुरखे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना तायडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्याप्रसारक हायस्कूल, बेलापूर येथील इयत्ता नववीतील अनुष्का सोमनाथ कोळी व अक्षता सचिन कातकरी तसेच नमुंमपा शाळा क्रमांक ४, सीबीडी बेलापूर येथील इयत्ता आठवीतील अनुजा शंभू माळेकर या विद्यार्थिनींना महापौरांच्या उपस्थितीत एचपीव्ही लस देण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर कंपासपेटी भेट देण्यात आली.


यावेळी बोलताना महापौर सुजाता पाटील यांनी सध्या कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरातील मुलींचे या आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली असून पालकांनी जागरूक राहून आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी शाळा, महानगरपालिका रुग्णालये, आरोग्य केंद्रे व सार्वजनिक ठिकाणी बॅनर्स लावून व्यापक प्रचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.


या मोहिमेत १४ वर्षे पूर्ण केलेल्या आणि १५ वर्षे पूर्ण न केलेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. मोहीम सुरू झाल्यानंतर पुढील ९० दिवसांत १५ वर्षे पूर्ण होणाऱ्या मुली देखील या तीन महिन्यांच्या मोहिमेत लसीकरणासाठी पात्र असतील.


नवी मुंबई महानगरपालिकेच्या ५ रुग्णालये व २६ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच IMA, IAP, NIMA  HIMPAM, खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे.


नवी मुंबईतील पालकांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून १४ ते १५ वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलीचे एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post