अमृतसर : शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर पंजाबमधील अमृतसरमध्ये बुधवारी प्राणघातक हल्ला झाला. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह यांची सुटका झाली आहे. सुवर्ण मंदिराच्या गेटवर एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारानंतर सुवर्ण मंदिराबाहेर एकच गोंधळ उडाला. मात्र, तेथे उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडले आहे. आजकाल सुखबीर सिंह बादल हे शिक्षा म्हणून सुवर्ण मंदिराबाहेर द्वारपाल म्हणून काम करत आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नारायण सिंह चैराला अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग हे सुवर्ण मंदिराबाहेर धार्मिक शिक्षा म्हणून द्वारपालचे काम करत होते. तेव्हा समोरून येणाऱ्या हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र, ही गोळी कोणालाही लागली नाही. गेटवर उभ्या असलेल्या लोकांनी हल्लेखोराला पकडले.
गोळीचा आवाज ऐकताच तेथे उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडले. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे याप्रकरणात हल्लेखोर नारायण सिंह चैरा बब्बर खालसा याला पकडण्यात आले असून तो इंटरनॅशनल दहशतवादी आहे. चैरा १९८४ मध्ये पाकिस्तानात गेला होता आणि दहशतवादाच्या सुरुवातीच्या काळात पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांच्या तस्करीत त्याचा मोठा हात होता. पाकिस्तानमध्ये असताना त्याने गनिमी युद्ध आणि देशद्रोहाचे साहित्य यावर एक पुस्तकही लिहिले आहे. बुडैल जेलब्रेक प्रकरणातीलही तो आरोपी देखील आहे. नारायणने यापूर्वी पंजाबच्या तुरुंगात शिक्षा भोगली आहे.
सोमवारी शिरोमणी अकाली दल (एसएडी) अध्यक्ष सुखबीर सिंह बादल अकाल तख्त साहिब येथे पंच सिंह साहेबांसमोर हजर झाले. अकाल तख्तच्या जथेदारांनी सुखबीर बादल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना दोषी धरून तंकह (धार्मिक गैरवर्तनासाठी दोषी) घोषित केले आहे, जे त्यांना पाळावे लागेल. शीखांची सर्वोच्च संस्था अकाल तख्तने दोन महिन्यांपूर्वी पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांना 'तंखैय्या' म्हणून घोषित केले होते.
सुखबीर सिंह बादल यांनी अकाल तख्त साहिबसमोर आपल्या चुकांची कबुली दिली. ईशनिंदा प्रकरणात सिरसा डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांना माफी देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी निरपराध शीखांच्या हत्येत सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिल्याचेही कबूल केले.