दिवा, (आरती मुळीक परब) : कलकत्या मधील मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टरवर झालेला सामूहिक अत्याचार करुन हत्या प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी एक दिवसीय देशव्यापी काम बंद आंदोलना मध्ये दिवा डॉक्टर मेडिकल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशन अंतर्गत दिव्यातील सर्व खाजगी डॉक्टर सहभागी झाले. तर सर्व डॉक्टरांनी रस्त्यावर उतरुन कलकत्यामधील घटनेचा निषेध व्यक्त करत व्ही व्हॉंट जस्टीस (We Wont justice) अशा घोषणा ही दिल्या.
कलकत्या मधील आरजी कार, मेडिकल कॉलेज, कलकत्ता येथे ९ ऑगस्ट रोजी एका पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या झाल्याची घटना घडली होती. याचा संपूर्ण भारतात निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संप सुरू केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित करत आहे. यालाच सपोर्ट म्हणून दिव्यातही दिवा डॉक्टर मेडिकल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशन अंतर्गत येणाऱ्या दिव्यातील ३० ते ४० खासगी डॉक्टरांनी स्वतःचे क्लिनिक २४ तासांसाठी शनिवारी बंद ठेवल्या. फक्त हॉस्पिटलमधील अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा सुरू राहतील. पण नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहे.
या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबियांस न्याय मिळवून देण्यासाठी आज दिव्यात डॉक्टरांतर्फे दिवा चौक ते विठ्ठल मंदिर, मुंब्रा देवी कॉलनी पर्यंत नंतर पुन्हा त्याच रस्त्यावर फिरुन दिवा चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. तर दिवा चौकात महिला डॉक्टरच्या हत्याऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी ही डॉक्टरांनी त्यावेळी केली. तसेच कलकत्यामधील घटनेचा निषेध व्यक्त करत व्ही व्हॉंट जस्टीस (We Wont justice) अशा घोषणा ही दिल्या.
डॉ. आय. आर. पासी, अध्यक्ष, दिवा मेडिकल प्रक्टिसनरस वेलफेअर असोसिएशन - कलकत्ता मधील मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार आणि खून प्रकरणाच्या आम्ही जाहीर निषेध करतो. असे अमानुष कृत्य कुठल्याही महिलेवर होऊ नये. ती डॉक्टर असो वा नसो. यासाठी आम्ही पूर्ण दिव्यातील आजच्या दिवशी अत्यावशक सेवा वगळून आमचे दवाखाने २४ तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवत आहोत. ज्यांनी हे दुष्टकृत्य केले आहे, त्यांना कुठल्या ही प्रकारची माफी न देता फाशीची शिक्षा व्हावी जेणे करून कधीच कुठल्याही ठिकाणी असे दुष्टकृत्य घडून येऊ नये वा कोणी करू नये.

