ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त-१ पदी मेजर डॉ. नितीन राठोड


ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त-१ पदी मेजर डॉ. नितिन राठोड (सेवानिवृत्त) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी ठाणे महापालिकेत रुजू होत अतिरिक्त आयुक्त-१ पदाचा पदभार स्वीकारला. महापालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी मेजर डॉ. राठोड हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते.


वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, भारतीय सैन्याचे माजी अधिकारी आणि प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असलेले अधिकारी म्हणून मेजर डॉ. नितिन राठोड यांची ओळख आहे. त्यांनी २००८ मध्ये प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. त्यानंतर २०१३ मध्ये डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधून ऑर्थोपेडिक्स विषयातील डिप्लोमा पूर्ण केला.


२०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी भारतीय सैन्यात ऑर्थोपेडिक्स विभागात कमिशन्ड मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा बजावली. सैन्यातील सेवेदरम्यान अस्थिरोग तसेच ट्रॉमा उपचार क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना सेना सर्व्हिस मेडल, ऑपरेशन रक्षक मेडल, डीजी जम्मू-काश्मीर पोलीस मेडल आणि जीओसी १५ कॉर्प्स मेडलियन यांसारख्या विविध सन्मानांनी गौरविण्यात आले.


कोविड-१९ महामारीच्या काळातही मेजर डॉ. राठोड यांनी प्रशासकीय जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. २०२० ते २०२२ या कालावधीत त्यांनी अंबरनाथ नगर परिषदेत कोविड-१९ प्रतिसादासाठी नोडल अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर २०२२ ते २०२३ दरम्यान त्यांनी जिल्हा सैनिक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. या काळात माजी सैनिकांचे कल्याण, त्यांच्या समस्या आणि विविध प्रशासकीय प्रश्नांच्या निराकरणासाठी त्यांनी काम केले.


वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान, भारतीय सैन्यातील अनुभव आणि प्रशासकीय कामकाजाची पार्श्वभूमी असलेल्या मेजर डॉ. नितिन राठोड यांच्या नियुक्तीमुळे ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महापालिकेच्या विविध विभागांमधील समन्वय, प्रशासनाची कार्यक्षमता आणि नागरिकांशी संबंधित प्रश्नांच्या प्रभावी निराकरणासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होण्याची शउक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post