ठामपा आगासन शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा


४१ विद्यार्थी शिवाजी रुग्णालयात दाखल 

दिवा, (आरती परब ) : दिवा शहरातील आगासन गाव येथील महापालिका शाळा क्रमांक ८८ मधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह जेवणामध्ये पाल सापडल्याने एकच गोंधळ उडाला. दिवा शहरात हा झालेला दुसरा गंभीर प्रकार असून महापालिका शाळांमध्ये पुरवठा केले जाणारे जेवण तात्काळ थांबवण्यात यावे व संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात यावा,  अशी आग्रही मागणी पालकांची आहे.


ही शाळा सकाळची असल्याने त्यांचे जेवण सकाळी १०.३० वाजता येऊन त्या शाळेतील ४१ मुलांना म्हणजे फक्त एका वर्गातील मुलांना वाटले गेले. त्या शाळेची पट संख्या ८५ आहे. जेवण संपल्यावर शेवटची डाळ घेताना शाळेतील एका सातवीतील मुलीला त्यात पाल दिसली. त्यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांना जेवण देणे थांबविले गेले. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांना कळवून मग शिवाजी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना याबाबत माहिती देण्यात आली. 


लगेचच घटना स्थळी शिक्षणाधिकारी आणि शिवाजी हॉस्पिटल, कळवाची डॉक्टरांची टीम शाळेत दाखल झाली. त्यावेळी एकूण ४१ विद्यार्थ्यांनी ते जेवण म्हणजे डाळ भात खाल्ला होता. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पोटदुखी, मळमळ आणि उलटी या सारखा त्रास सुरू झाल्यास त्वरीत ४ रुग्णवाहिकेतून सुमारे ४१ विद्यार्थ्यांना शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


या प्रकारानंतर पालकांनी शाळेत जाऊन पाहणी करून शाळा प्रशासन व महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आली होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी न घेणाऱ्यांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात येऊन त्या आदर्श बचत गटाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी पालकांनी केली आहे. 


 या आदर्श बचत गटाचा जेवणा बाबतचा निष्काळजी पणा योग्य नसून त्यांच्या कडून आम्ही हे शाळेत जेवण द्यायचे काम उद्या पासून थांबवत आहोत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची केली जाईल. तर गेल्या आठवड्यात मी पालिकेच्या सर्व शाळेत जेवण पुरवठा करणाऱ्या बचत गटांची बैठक घेतली होती. त्यात त्यांना कडक सूचना दिल्या होत्या. यापुढे असे होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

- कमलाकर मेहेत्रे, शिक्षणाधिकारी 

Post a Comment

Previous Post Next Post