दिवा टर्निंग ते बी.आर. नगर मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

 


ठाणे महापालिकेला शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे निवेदन 


दिवा \ आरती मुळीक परब  : दिवा शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे दिवा टर्निंग ते बी.आर. नगर मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या मार्गावरून दररोज रुग्णालयांकडे जाणारी रुग्णवाहिका, शाळांकडे जाणारे विद्यार्थी पालक तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. मात्र, बेफाम वाहनचालकांमुळे अपघातांची शक्यता वाढली असून नागरिकांना मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे.


या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिव्यातील शाखा प्रमुख विलास काशिराम उतेकर यांनी ठाणे महानगरपालिकेकडे निवेदन सादर करून या रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे.


निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, टर्निग समोरील हरदेव हॉस्पिटल, मेट्रो हॉस्पिटल, सिध्दिविनायक हॉस्पिटल आणि एस.एम.जी विद्यालय परिसरातून सतत वाहने वेगाने धावत असल्याने पादचारी आणि लहान मुलांचे, पालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करून गतिरोधक बसविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


शाखा प्रमुख विलास उतेकर यांनी केलेल्या या मागणीवर ठाणे महापालिका प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post