कोकण पट्ट्यात ३९ पैकी ३५ जागा महायुतीला

Maharashtra WebNews
0






 महायुती विजयात रवींद्र चव्हाणांचा मोठा हात


डोंबिवली ( शंकर जाधव ) : भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी महायुतीने कोकण पट्ट्यात ३९ पैकी ३५ जागा जिंकून कोकणातला विजयाचा स्ट्राईक रेट ९० टक्के नोंदवला आहे. त्याचे श्रेय प्रामुख्याने भाजप नेते आमदार रवींद्र चव्हाण यांच्या कुशल राजकीय डावपेचांना जाते. मुंबई महानगर प्रदेश व कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा इथेही रवींद्र चव्हाण यांच्या राजकारणाचे ठसे उमटल्याने महायुती सरस ठरल्याचे निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे. 


डोंबिवलीसारख्या रास्व संघ - भाजपच्या विचारधारेशी अतूट नाते असणाऱ्या सुसंस्कृत शहराचे रवींद्र चव्हाण प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाते आणि संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज असा अनोखा मिलाफ रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे, त्यामुळे एकाच वेळेस संघाची वैचारिक बैठक आणि संघटनेची ताकद असे दुहेरी कौशल्य असलेला नेता त्यांच्या रूपाने भाजप महायुतीला मिळाला आहे. लोकसभा निवडणूक असो, विधानसभा निवडणूक असो किंवा मग विधान परिषदेची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, गेल्या काही महिन्यांमध्ये भाजप-महायुतीला सातत्याने यश मिळत आहे. या यशात रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय कौशल्याचे ठसे होते त्यामुळेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा निवडणूक प्रचार यंत्रणा प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्यावरच टाकली होती.


रवींद्र चव्हाण यांनी मागील सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम सारखे महत्त्वाचे खाते सांभाळले त्यातून त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक ९६ हजार कोटी रुपयांचा निधी राज्याच्या पायाभूत सुविधा विकासासाठी उपलब्ध करून दिला. भाजप महाराष्ट्राच्या कोअर कमिटीचे सदस्य, महामंत्री आणि महत्त्वाचे कॅबिनेट मंत्रिपद अशा तीन पातळ्यांवर काम करताना राज्याच्या सर्वच भागांतील राजकीय, सामाजिक आणि पक्षीय परिस्थितीचे आकलन रवींद्र चव्हाण यांना होते. त्यांच्या राजकीय रणनीतीवर शीर्षस्थ नेतृत्वचाही भरवसा असल्याने त्यांना उमेदवार निवडीचाही अधिकार होता त्यातूनच रविंद्र चव्हाण यांनी पक्षाला जिंकण्याची  शक्यता असलेले उमेदवार दिल्याचे बोलले जाते.


    विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात रवींद चव्हाण यांनी कधी पालघर, तर कधी रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे करत अख्खे कोकण पालथे घातले. सभा घेत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला, बैठका घेत प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत कोकणातील ३९ जागांपैकी ३५ जागांवर भाजप-महायुतीचा विजय झाला. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बविआ पक्षाला मात देत ६ पैकी ५ जागांवर महायुतीने विजयाचा ध्वज फडकावला. हा विजय हे रवींद्र चव्हाण यांच्या कुशल रणनीतीचे आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीचे फळ आहे.या विजयानंतर रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर आणि कोकण तसेच पालघर भागातील भाजपच्या कामगिरीवर लोकांचा मोठा विश्वास असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि रवींद्र चव्हाण समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)