नाविन्यपूर्ण योजनेतून राज्यातील पहिलाच अभिनव उपक्रम
कोल्हापूर \ शेखर धोंगडे
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राज्यातील पहिल्याच अभिनव उपक्रमात जिल्ह्यातील ७२ विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आज विमानाने इस्रो (ISRO) अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाली.
पहिल्या टप्प्यात समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. पन्हाळा, शिरोळ, राधानगरी व गगनबावडा तालुक्यातील शाळांमधील गुणवंत, होतकरू व जिज्ञासू विद्यार्थी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना या दौऱ्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.
या अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थी बेंगळुरू व हैदराबाद येथील इस्रो संस्थांना भेट देणार असून उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण प्रक्रिया, अंतराळ संशोधन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रत्यक्ष माहिती घेणार आहेत. प्रत्यक्ष अनुभवातून वैज्ञानिक वातावरण अनुभवण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा निर्माण होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांमधील सुमारे २८० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून राज्यात प्रथमच हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
मागासवर्गीय प्रवर्गातील कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शिक्षण व अनुभवाच्या संधींपासून वंचित राहू नये, याची काळजी शासन घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. सामाजिक समानता, संधीची उपलब्धता व शैक्षणिक परिवर्तनाच्या दिशेने सामाजिक न्याय विभागाने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी समाज कल्याण पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) सचिन साळे, जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे, समाज कल्याण कार्यालय अधीक्षक सचिन पाटील, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक सुप्रिया काळे, तसेच सुनील पाटील, अतुल पवार, चित्रा शेंडगे, सुभाष पवार, सचिन परब, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व पालक उपस्थित होते.


