दिवा \ आरती परब : दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणारा प्रभाग क्रमांक २९ हा भौगोलिकदृष्ट्या किलोमीटरनुसार मोठा असला तरी लोकसंख्येने तुलनेने कमी आहे. मात्र या प्रभागात शिवसेनेच्या जोरदार बाईक रॅलीने निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग दिला.
ही भव्य बाईक रॅली साबे, खर्डी, शिळगाव, पडले, डावले, डायघर, देसाई, खिडकाळी, भोलेनाथ नगर, ठाकूर पाडा तसेच दोस्ती सोसायटी या संपूर्ण परिसरातून फिरली. रॅलीत अंदाजे १०० ते १५० दुचाकीस्वार सहभागी झाले होते.
या रॅलीत प्रभाग क्रमांक २९ मधील शिवसेनेच्या उमेदवार अर्चना पाटील, वेदिका पाटील आणि बाबाजी पाटील हे तिघेही उमेदवार प्रत्यक्ष सहभागी झाले होते. उमेदवारांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्साहपूर्ण वातावरणात, घोषणाबाजी आणि संघटनेच्या शक्तीप्रदर्शनामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. या बाईक रॅलीचे नागरिकांनी विशेष कौतुक करत शिवसेनेच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
