अलिबाग, (धनंजय कवठेकर) : पेण तालुक्यातील खवसावाडी, उंबरवाडी, तांबडी रस्त्याचे काम महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असून, कामाचा ठेका सिध्दीविनायक कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आला आहे. सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत २४ जानेवारी २०२५ पर्यंत असून, रस्त्याचे काम लवकरच हाती घेण्यात येवून वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे अलिबाग उपविभाग उपअभियंता राजेंद्र खेडेकर यांनी दिली आहे.
पेण तालुक्यातील बोरगाव येथील खवसावाडी येथील एका महिलेचा मृतदेह पाच किलोमीटर अंतरापर्यंत झोळीत टाकून न्यावा लागला होता. या घटनेनंतर खवसावाडी येथील रस्त्याच्या कामाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तसेच रस्त्याचे काम सुरू न करता ठेकेदाराला बिलाची रक्कम अदा करण्यात आला असल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र रस्त्याचे काम सुरू करण्यात न आल्याने ठेकेदाराला कोणतेही बिल अदा करण्यात आला नसल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेने स्पष्ट केले आहे.
पेण तालुक्यातील खवसा, उंबरवाडी, तांबडी रस्त्याचे कामाचा ठेका सिध्दीविनायक कन्स्ट्रक्शन कंपनीला २५ जानेवारी २०२४ रोजी देण्यात आला आहे. सदर काम करण्यासाठी कंपनीला २४ जानेवारी २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली असून, लवकरच काम सुरू करून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत.
खवसावाडी येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी शनिवारी (दि.९) भेट दिली. यावेळी त्यांनी येथील रस्त्याची तसेच इतर विकास कामांची पाहणी केली तसेच ग्रामस्थांसोबत चर्चा केली. रस्त्याच्या कामाबाबत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून लवकरच रस्त्याचे काम पूर्ण करण्याची सूचना केली. तसेच येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल देवांग, पेण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते, पेण उपविभाग बांधकाम विभागाचे अभियंता बागुल, शाखा अभियंता मनीषा शिद, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता रवी पाचपोर, बोरगाव ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक गणेश पाटील उपस्थित होते.