४ लाख रुपये किंमतीच्या एकूण ७ मोटारसायकली जप्त
कोल्हापूर ( शेखर धोंगडे) : कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टिने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना वाहन चोरीचे रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या.
पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडीत यांनी दिले सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा, कोल्हापूर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की, अभिषेक खोत व त्याचा एक साथीदार यांनी अनेक मोटारसायकली चोरलेल्या असून ते दोघे शनिवारी मोटारसायकल विक्री करण्यासाठी हॉटेल सावली येथे येणार आहेत, अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी १] अभिषेक सुरेश खोत २] हर्ष योगेश कोलप यांनी अटक केली.
यावेळी त्या दोघांकडून विना नंबर प्लेटची ०१ स्प्लेंडर मोटारसायकल आढळून आली. सदर मोटर सायकलचे चेसी नंबर व इंजिन नंबरवरून पाहणी केली असता सदरची मोटारसायकलगांधीनगर पोलीस ठाणे येथून चोरीस गेली असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी आणखीन ०५ मोटर सायकली चोरी केल्याची कबुली देवून चोरलेल्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत साो, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, स.पो.नि. चेतन मसुटगे, तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, संतोष बरगे, परशुराम गुजरे, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील, विशाल खराडे, प्रविण पाटील व कृष्णात पिंगळे यांनी केली आहे.
