NCMC कार्ड नसलेल्या महिलांना एसटी सवलत मिळणार


मुंबई : राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवासाच्या सवलतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी सध्या कार्ड नसलेल्या पात्र प्रवाशांना सवलतीपासून वंचित ठेवू नये, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महिलांना एसटी महामंडळाच्या बस प्रवासात ५० टक्के भाडेसवलत दिली जाते. याशिवाय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत मिळते, तर ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवास मोफत आहे. या सवलतींचा लाभ देताना प्रवाशांची ओळख आणि पात्रता निश्चित करण्यासाठी NCMC कार्डचा वापर करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. त्यासाठी १ सप्टेंबरपासून कार्ड अनिवार्य करण्याची तयारी करण्यात आली होती. कार्ड नसलेल्या महिलांना त्यानंतर पूर्ण तिकीट दर आकारण्याची शक्यता होती.

मात्र, सध्या गणेशोत्सव आणि गौरी-गणपतीचा सण जवळ आल्याने मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भाविक एसटीने प्रवास करतात. अशा परिस्थितीत NCMC कार्ड नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, अशी भूमिका आशिष शेलार यांनी घेतली आहे.

प्रवाशांना NCMC कार्ड मिळविण्यासाठी आणखी वेळ देण्यात यावा, तसेच कार्डची सक्ती १ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलण्याबाबत विचार करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. तोपर्यंत पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना कार्ड नसले तरी सवलतीचा लाभ सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे सध्या NCMC कार्ड काढलेले नसलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्रवाशांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, NCMC कार्डची सक्ती आणि सवलतीच्या अंमलबजावणीबाबत एसटी महामंडळाकडून पुढील अधिकृत निर्णय काय घेतला जातो, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post