खेबुडकर यांची पुण्यात आयुक्तपदी नियुक्ती
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अपूर्वा बासूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खेबुडकर यांची पुणे येथील भूजल सर्वेक्षण विकास संस्थेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांवर प्रशासकीय राजवट असताना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. खेबुडकर यांनी १७ मार्च २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली होती.
त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या आणि लोकनियुक्त प्रतिनिधींचा कारभार सुरू झाला. मात्र, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच खेबुडकर यांची बदली करण्यात आल्याने या बदलीची चर्चा जिल्हा प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, खेबुडकर यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेल्या श्रीमती अपूर्वा बासूर या सध्या पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
अपूर्वा बासूर या थेट भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) कार्यरत असून, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झालेली त्यांची नियुक्ती हे पहिलेच स्वतंत्र पोस्टिंग असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कारभाराची धुरा आता एका युवा आयएएस अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे.
खेबुडकर यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा प्रशासकीय कारभार त्यांनी सांभाळला. आता त्यांची पुणे येथील भूजल सर्वेक्षण विकास संस्थेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने ते लवकरच नवीन पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. अचानक झालेल्या या प्रशासकीय बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आगामी कारभाराकडे जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
