मुंबई: आरोग्य विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असलेल्या निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सने शुक्रवारी सामान्य लोकांसाठी आपली २,२०० कोटी रुपयांची इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) उघडली आहे. या आयपीओची गुंतवणूकदार आणि बाजारातील तज्ज्ञांकडून दीर्घकाळ वाट पाहिली जात होती आणि आता आरोग्य विमा क्षेत्रात गुंतवणूकीची मोठी संधी म्हणून याकडे पाहिले जात आहे.
आरोग्य विम्याचा रु. २,२०० कोटी IPO गुंतवणूकदारांसाठी ७ ते ११ नोव्हेंबर दरम्यान खुला होईल. या IPO मध्ये, प्रति शेअर किंमत ७०-७४ रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि गुंतवणूकदार किमान २०० शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतात. या प्रकरणातील ७५ टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB),१५ टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) आणि १० टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत. इश्यूचे रजिस्ट्रार Kfin Tech आहेत. IPO अंतर्गत ८०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय १० रुपये दर्शनी मूल्य असलेले १८,९१,८९,१८९ शेअर्स ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत विकले जातील.
निवा बुपा IPO ही भारतातील आघाडीच्या आरोग्य विमा कंपन्यांमध्ये गणली जाते. गेल्या काही वर्षांत त्याचा ग्राहकवर्ग झपाट्याने वाढला आहे आणि कंपनीची आर्थिक स्थितीही समाधानकारक मानली जाते. कंपनीने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत आणि तिचे व्यवसाय मॉडेलही स्थिर असल्याचे दिसून येत आहे. निवा बुपाचे प्रीमियम कलेक्शन आणि क्लेम सेटलमेंट रेशो हे या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट आहेत, ज्यामुळे ते सकारात्मक गुंतवणुकीचे संकेत आहेत.
