अलिबाग, ( धनंजय कवठेकर ) : वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द आणि मेहनत लागले. अलिबाग तालुक्यातील थळ येथील आर्यन खारकर या तरुणाने जिद्दीच्या जोरावर, मोठ्या संघर्षातून क्रिकेटमध्ये गगन भरारी घेतली आहे. शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्याकडून मिळालेले प्रोत्साहन, आई, वडीलांच्या पाठबळातून इंडियन स्ट्रीट प्रिमिअर लीग( ISPL) मध्ये निवड झाली आहे. तो फाल्कन रायझर्स हैदराबाद संघातून खेळणार आहे.
इंडियन स्ट्रीट प्रिमिअर लिगमध्ये तालुक्यातून वेगवेगळ्या क्रिकेटपट्टूचे अर्ज भरण्याचे काम शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांनी केले आहे. खेळाडूंचे प्रवेश शुल्क चित्रलेखा पाटील यांनी भरले. त्यामध्ये आर्यन संतोष साखरकर या १९ वर्षाखालील क्रिकेट पट्टूने अर्ज भरला होता. या लिगची पहिली चाचणी अलिबागमध्ये झाली. दुसरी चाचणी मुंबई येथील धारावी आणि तिसरी चाचणी मुंबईमधील मालाड येथे झाली होती. या चाचण्या देताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावेळी शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचा पाठींबा आणि साई पाटील यांच्या सहकार्यामुळे आर्यन खारकरची आयएसपीएलमध्ये निवड झाली.
निवडी अगोदर झालेल्या लिलाव प्रक्रियेत आर्यनवर तीन लाखांची बोली लावण्यात आली. त्याची फाल्कन रायझर्स हैदराबाद संघात गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर चित्रलेखा पाटील यांनी आर्यनचे अभिनंदन करीत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आर्यन खारकर हा तरुण अलिबाग तालुक्यातील थळ येथील रहिवासी आहे. समुद्रकिनारी अन्य ठिकाणी होत असलेल्या क्रिकेट स्पर्धा बघून त्याला क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली.गावांमधील मुलांचे क्रिकेट खेळ बघून त्यालादेखील क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. गावासह समुद्रावर तो क्रिकेट खेळत होता. त्याला गोलंदाजी करण्याची आवड निर्माण झाली. चांगली गोलंदाजी करू लागल्याने गावातील थळेश्वर संघातून खेळण्याची संधी त्याला मिळाली. गेली दोन वर्षे या संघातून खेळत राहिला. क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करीत असल्याचे लक्षात आल्यावर नावाजलेल्या एकविरा संघाने क्रिकेटच्या संघात सहभागी करून घेतले.
वयाच्या १४ वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. दोन वर्षे थळेश्वर थळ संघातून खेळल्यानंतर आता एकविरा थळ संघातून खेळत आहे. आर्यनचे शिक्षण तेरावीपर्यंत झाले आहे. गेली पाच वर्षापासून क्रिकेट क्षेत्रात कार्यरत आहे. रायगड प्रिमिअर लिगमधून एक वेगळी ओळख निर्माण झाली. वेगवान गोलंदाज म्हणून नावारूपाला आला. अलिबागसह संपुर्ण जिल्ह्यात आर्यनचे नाव पोहचले. पनवेलमधील शिरढोण येथे झालेल्या रायगड प्रिमिअर लिगमध्ये संघातून चांगली कामगिरी बजावली. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून दखल घेत त्यावेळी दुचाकी बक्षीस मिळाली. कमी वयात सर्वात मोठे बक्षीस मिळविणारा खेळाडू म्हणून आर्यन ठरला आहे. आतापर्यंत त्याने अनेक बक्षीसे मिळविली आहे.
शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या पुढाकाराने कुरुळ येथे पीएनपी चषक भरविण्यात आले. या स्पर्धेतून अनेक खेळाडूंना व्यासपिठ मिळवून देण्याचे काम चित्रलेखा पाटील यांनी केले. त्यांच्या पुढाकाराने राबविलेल्या या उपक्रमामुळे अलिबाग व इतर तालुक्यातील खेळाडूंना आयपीएलच्या धर्तीवर खेळण्याची संधी मिळाली.पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धेत आर्यन साखरकरला सुद्धा खेळण्याची संधी मिळाली. आर्यनला गोलंदाजीमध्ये आवड असून वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ऐक वेगळी ख्याती आहे. आतापर्यंत त्याने क्रिकेट स्पर्धेतून दोन हजारहून अधिक गोलंदाजांना आऊट करण्याचा मान मिळविला आहे.
आतापर्यंत गावातील क्रिकेट स्पर्धांबरोबरच पीएनपी चषक व रायगड प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. या संधीचे सोने करण्याचा कायमच प्रय़त्न त्याने केला आहे. परंतु चित्रलेखा पाटील यांच्या सहकार्यातून (आयएसपीएल) इंडियन स्ट्रीट प्रिमिअर लीग स्पर्धेतून खेळण्याची संधी मिळाली आहे. आर्यनला त्याच्या आई, वडीलांकडून चांगले सहकार्य मिळाले आहे. पालकांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे आर्यनने क्रिकेट खेळातून अलिबागसह थळ गावाचे नाव लौकीक केले आहे.
चित्रलेखा पाटील यांच्याकडून कौतूक
आयएसपीएल क्रिकेट स्पर्धेतून खेळाडूंना व्यासपिठ मिळावे यासाठी चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने खेळाडूंना मोफत प्रवेश देण्याचा प्रयत्न चित्रलेखा पाटील यांनी केला. त्यांच्यामुळे आर्यनसह अनेक खेळाडू आज या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आर्यन साखरकरची आयएसपीएलमध्ये निवड झाल्याबद्दल आर्यन साखरकर या खेळाडूचे शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
आई, वडीलांची साथ कायमच
आर्यन साखरकर हा थळ मधील खेळाडू आहे. आर्यनची खेळातील आवड बघून त्यांनी त्याला त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केले. आई, वडीलांकडून मिळालेल्या पाठींब्यामुळे आर्यन आज एक वेगळ्या उंचीवर पोहचला आहे. आर्यनला आई, वडीलांची साथ कायमच राहिली आहे.