कल्याण- डोंबिवली महापालिकेमार्फत विशेष स्वच्छता मोहिमेचे नियोजन !

Maharashtra WebNews
0

 


हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष उपक्रम 

कल्याण,( शंकर जाधव) : कल्याण - डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एअर क्वालीटी इंडेक्स सुधारण्यासाठी, रस्ते संपूर्ण स्वच्छता करून धुळमुक्त करणे, या हेतुने महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील सर्व मुख्य रस्ते रात्रपाळीत स्वच्छ करण्यात येत आहेत.


याकारिता विभागामार्फत नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार २३ रस्ते पॉवरस्वीपर मशीन द्वारे व ५७ रस्ते हे मनुष्यबळाद्वारे रात्रपाळीत सहा.आयुक्त प्रिती गाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, परिमंडळ -१(कल्याण) चे उप मुख्य स्वच्छता अधिकारी मोहनीश गडे तसेच परिमंडळ-२ (डोंबिवली) चे उप मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र खैरे यांचे नियंत्रणाखाली स्वच्छ करण्यात येत आहे.


प्रभागक्षेत्र स्तरावर सुरू असलेल्या रात्रपाळीत कामाची गुणवत्ता तपासणेकामी १/अ प्रभाग क्षेत्रातील मोहने गेट, २/ब प्रभाग क्षेत्रातील प्रेम ऑटो ते व्हटेक्स व खडकपाडा ते झुलेलाल चौक, ८/ग प्रभाग क्षेत्रातील इंदिरा गांधी चौक ते गावदेवी मंदिर परिसर, मलंगरोड या ठिकाणी महापालिका अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील, सहा.आयुक्त प्रिती गाडे यांनी रस्तेसफाई दरम्यान भेट देवून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.यावेळी कार्यवाही दरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत संबंधीत स्वच्छता अधिकारी, स्वच्छ्ता निरीक्षक व इतर कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच कामाची गुणवत्ता वाढविणेबाबत सूचना देण्यात आल्या.


सदर कार्यवाही ही ४ पॉवर स्वीपर वाहने व २०० मनुष्यबळाच्या सहाय्याने करण्यात येत असून, प्रत्यक्ष कामाचे नियोजन करणेकामी संबंधीत परिसरातील स्वच्छता निरीक्षक यांचेवर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सदर कार्यवाही दरम्यान आतापर्यंत  जवळपास १५ टन धूळ व माती तर रस्त्यावरील जवळपास १५० टन  कचरा उचलण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या धूळ क्षमन वाहनांमार्फत देखील नियोजन बध्द कार्यवाही करण्यात येत असून, यामुळे महापालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीमुळे कल्याण - डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एअर क्वाॅलिटी इंडेक्समध्ये सुधारणा होण्यास मदत झाली आहे. सदर कार्यवाही ही पुढील कालावधीमध्ये देखील सुरू राहणार असल्याचे माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)