ऑस्ट्रेलिया, भारत आणि श्रीलंका संघांमध्ये लढत
पुढील वर्षी इंग्लंडमध्ये लॉर्ड्स येथे खेळल्या जाणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी दक्षिण अफ्रीका संघाचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. सोमवारी, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा १०९ धावांनी पराभव करून केवळ मालिकाच जिंकली नाही, तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या या चक्रात सर्वाधिक विजयाची टक्केवारी असलेला संघ बनला. यामुळे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पहिल्या स्थानावरून मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे.
अंतिम फेरीच्या शर्यतीत सामील असलेल्या भारतीय संघालाही धक्का बसला आहे. आता उर्वरित एका जागेसाठी श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात लढत होणार आहे. श्रीलंकेला ऑस्ट्रेलियासोबत २ सामन्यांची मालिका खेळायची आहे आणि ऑस्ट्रेलियाला भारतासोबत आणखी ३ सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक सामने खेळायचे आहेत त्याचबरोबर ते अंतिम फेरीच्या शर्यतीत देेखील आहेत. ऑस्ट्रेलियाला आणखी ५ सामने खेळायचे आहेत पण भारताविरुद्धचे तिन्ही सामने हरले तर ते अंतिम फेरीतून बाहेर होतील. तथापि, त्यांनी भारताविरुद्धचा सामनाही जिंकला आणि श्रीलंकेला २-१ ने पराभूत केले तर श्रीलंका आणि भारत बाहेर पडतील आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहोचेल.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारतीय संघाला पुढील सामने जिंकणे गरजेचे आहे. उर्वरित ३ स्थानांवर ऑस्ट्रेलियाचा आधीच वरचष्मा होता आणि आता दक्षिण आफ्रिकेचे एक स्थान जवळपास निश्चित झाले असताना भारतीय संघाचा एक पराभव त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर करण्यासाठी पुरेसा आहे. टीम इंडियाकडे फायनलमध्ये पोहोचण्याचा एकच मार्ग आहे, रोहित आणि कंपनीला उर्वरित तीन सामने कोणत्याही किमतीत जिंकावे लागतील.