अलिबाग (धनंजय कवठेकर) : अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावरील भव्य लायन्स फेस्टीवल निमित्ताने इंडियन आयडॉल श्वेता दांडेकर प्रस्तुत 'लाटा सुरांच्या ' हा मराठी, हिंदी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. यात दूरदर्शनवर झळकलेले अनेक कलाकार मंचावर उपस्थित होते. गायक अमोल पालेकर, संजय दांडेकर निर्मित देखण्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिम सुतार यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले. लायन नितीन शेडगे यांनी मुख्य आयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या या संगीत रजनीस फेस्टिवल अध्यक्ष लायन नयन कवळे, सेकंड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रवीण सरनाईक, फेस्टिवलचे जनक लायन अनिल म्हात्रे, फर्स्ट व्हीपी प्रदीप नाईक, संजय पाटील, लायन अध्यक्ष ॲड. गौरी म्हात्रे, सचिव महेश कवळे, खजिनदार अंकिता म्हात्रे, भगवान मालपाणी , गिरीश म्हात्रे, संतोष पाटील, महेंद्र पाटील यांच्यासह लायन्स अलिबाग सदस्य, डायमंड सदस्य आणि दहा हजारांहून अधिक संख्येने श्रोतृवृंद उपस्थित होता.
महाराष्ट्राची सांस्कृतिक पार्श्वभूमी कथन करणारी नवी जुनी कोळीगीते, लोकगीते यांच्या तालावर अलिबागकर मंत्रमुग्ध होऊन थिरकले. लाटा सुरांच्या या संगीत रजनी कार्यक्रमापूर्वी डॉ नितीन भोसले आयोजित पेट शो सादर झाला. यामध्ये कुत्रा, मांजर यांच्या असंख्य जाती, प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये आणि प्रात्यक्षिकांमधून डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कवायती पाहावयास मिळाल्याने पाळीव प्राणी प्रेमींसाठी ती एक पर्वणी ठरली.