पालिकेच्या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत
नवी मुंबई : स्वच्छतेसोबतच नवी मुंबई शहरातील पर्यावरणाकडे विशेष लक्ष देत नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत डीप क्लीनिंग ड्राईव्हचा पंधरवडा हाती घेण्यात आलेला आहे. यामध्ये नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्यात आला असून १३ जानेवारीपर्यंत प्रत्येक दिवशी सर्व आठही विभागात मुख्य रस्ते व पदपथ आणि दुर्लक्षित जागेची सखोल स्वच्छता (Deep Cleaning Drive) केली जात आहे.
आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या सूचनांनुसार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ १ उपायुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ २ उपआयुक्त संतोष वारुळे तसेच परिमंडळ १ चे उपायुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह विभागातील अधिकारी, कर्मचारीवृंद तसेच स्वच्छताकर्मी यांच्या माध्यमातून सखोल साफसफाई करण्यात येत आहे.
या अंतर्गत रस्ते तसेच रस्त्यांच्या कडेचे पदपथ याठिकाणी जमा झालेली माती व धूळ आणि त्या लगतच्या भिंती व कुंपणे यांची सफाई करण्यात येत असून त्याठिकाणी प्रक्रियाकृत पाणी मारुनही अधिकची स्वच्छता करण्यात येत आहे. या करीता आधूनिक फॉगर्स मशीनचा वापर करण्यात येत असून त्याव्दारे स्वच्छतेला गतीमानता आली आहे व अधिक प्रभावीपणे स्वच्छता करणे शक्य होत आहे. माती व धूळ साफ केल्याने हवेचीही स्वच्छता होत असून हवा गुणवत्तेत लक्षणीय बदल होत असल्याचे जाणवत आहे. तशा संतोषजनक प्रतिक्रिया सकाळी व संध्याकाळी जॉगींगला उदयाने व मोकळया जागी फिरणारे नागरिक व कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक यांच्यामार्फत व्यक्त केली जात आहे.
नवीन वर्ष जवळ आले की अनेकजण विविध संकल्प करतात व त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करतात. नवी मुंबई महानगरपालिकेनेही हवा गुणवत्ता सुधारणा व शहर स्वच्छता ही दोन प्रधान उद्दिष्ट्ये नजरेसमोर ठेवून १३ जानेवारीपर्यंत आठही विभाग कार्यालय क्षेत्रात सखोल स्वच्छता मोहीमांना प्रारंभ केला आहे.
या अनुषंगाने नववर्षारंभदिनी १ जानेवारी रोजी ज्वेल ऑफ नवी मुंबई रस्ता (बेलापूर विभाग), डी मार्ट समोरील रस्ते (तुर्भे विभाग), कांचनगंगा अपार्टमेंट ते डि मार्ट सर्कल (कोपरखैरणे विभाग), बर्गर किंग ते सेक्टर ६ नाला दोन्ही बाजू (घणसोली विभाग), दिवा सर्कल ते युरो स्कुल (ऐरोली विभाग) आणि ठाणे बेलापूर रस्ता ते राम नगर एमआयडीसी रोड (दिघा विभाग) या रस्त्यांवर सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या.
त्याचप्रमाणे २ जानेवारी रोजी आग्रोळी सेक्टर ३० रस्ता (बेलापूर विभाग), प्रशांत कॉर्नर ते राजीव गांधी ब्रीज सेक्टर ६ (नेरुळ विभाग), वाशी ब्रिज हायवे ते वाशी गाव नर्सरी तसेच सेक्टर ९ परिसर यांच्याप्रमाणेच वाशी विभागातील शिल्पाकृती व भित्तीचित्रे (वाशी विभाग), जयपुरीयार शाळा व मोराज परिसर (तुर्भे विभाग), महापे एमआयडीसी रस्ता (कोपरखैरणे विभाग), बर्गर किंग ते सेक्टर ६ नाला दोन्ही बाजू (घणसोली विभाग), युरो स्कूल ते नेव्हा गार्डन (ऐरोली विभाग) आणि रामनगर एमआयडीसी रोड ते वोडाफोन कंपनी कॉर्नर (दिघा विभाग) येथे प्रभावीपणे डीप क्लीनिंग ड्राईव करण्यात आले. अशा प्रकारच्या डीप क्लीनिंग मोहीमा केलेल्या नियोजनानुसार सर्व आठही विभाग कार्यालय क्षेत्रात राबविण्यात येत आहेत.