कोल्हापूर, ( शेखर धोंगडे ) : शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालय व संस्थांमधील अखिल भारतीय उच्चशिक्षण सर्वेक्षण (एआयएसएचई) कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी यांच्याकरिता एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले होते. विद्यापीठाचा सांख्यिकी कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू सभागृहात ही कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते. पुण्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे सांख्यिकी अधिकारी तथा महाराष्ट्र राज्याचे एआयएसएचई नोडल अधिकारी स्वप्नील कोरडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एस. डी. डेळेकर यांनी नॅक वेब पोर्टलवरील माहिती, विविध रँकिंग, परिसस्पर्श योजना आदी बाबींची माहिती उपस्थितांना दिली.
विद्यापीठाचे सांख्यिकी अधिकारी तथा एआयएसएचई नोडल अधिकारी अभिजित रेडेकर यांनी वेब पोर्टलवर माहिती भरण्याचे प्रशिक्षण दिले. सदर पोर्टलवर नव्याने बदल झालेले असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या माहितीचा समावेश करण्यात आला आहे. सदर बदललेल्या माहितीच्या अनुषंगाने रेडेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी कोल्हापूर, सांगली व सातारा या परिक्षेत्रातील विद्यापीठ संलग्नित महाविद्यालय व संस्थांतील दोनशेहून अधिक नोडल अधिकारी उपस्थित होते.