ठाणे : ठाणे शहरात विविध विकासकामांसाठी ठाणे पालिका प्रशासन सर्वतोपरी मदत करत असल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र माजी महापौर यांच्या आदेशाचे आठ वर्षानंतरही अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. शास्त्रीनगर येथील महापालिकेचे डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयाच्या दुरवस्थेमुळे स्थलांतरीत करण्यात आले आणि त्याजागी एक सुसज्ज असे रुग्णालय उभारण्याचे आदेश माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी २०१७ साली ठाणे महापालिका प्रशासनास दिले होते. मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ठाणे शहरातील वर्तक नगर, शास्त्री नगर आणि शिवाई नगर येथील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी शास्त्री नगर येथे पालिकेमार्फत डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयाची (प्रसूतिगृह) उभारण्यात आले होते. या रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणी, प्रसूतिगृहाची व्यवस्था तसेच लहान मुलांचे लसीकरण अशा विविध सुविधा एकाच ठिकाणी प्राप्त होत होत्या. मात्र काही शुल्लक दुर्घटनेनंतर या रुग्णालयाचा पुनर्विकास करण्याचे आदेश माजी महापौरांनी दिले होते. या रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासाठी पालिकेच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे माजी महापौरांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र आज मात्र आठ वर्षे उलटून देखील ही इमारत पडीत अवस्थेत उभी असल्याचे चित्र आजही पहावयास मिळत आहे.
डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच वर्तक नगर, शास्त्री नगर आणि शिवाई नगर येथील नागरिकांसाठी उपयुक्त असे रुग्णालय होते. जेणेकरून बाह्यरुग्ण तपासणी, प्रसूतिगृहाची व्यवस्था तसेच लहान मुलांचे लसीकरण अशा विविध सुविधा एकाच ठिकाणी मिळत होत्या. मात्र याचे स्थलांतर झाल्यापासून येथील नागरिकांना आरोग्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय येथील बाह्यरुग्ण तपासणीचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात शिवाई नगर येथील उन्नती मैदानात असलेल्या सांस्कृतिक मंचावर सुरू आहे. मात्र या मैदानावर राजकीय नेत्यांचे तसेच इतर मान्यवरांचे सतत उत्सव, कार्यक्रम सुरू असल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची घुसमट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचबरोबर अपुऱ्या जागेअभावी येथे मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होत असते. त्यामुळे नाईलाजास्तव काही रुग्ण लोकमान्य नगर येथील कोरस या रुग्णालयाचा आधार घेतात. मात्र तेथे देखील गर्दी वाढत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा कामाचा त्रास वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच शास्त्रीनगर येथील डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयाचा लवकरात लवकर पुर्नविकास करावा अशी मागणी स्थानिक करत आहेत.


