ठाणे : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरी संरक्षण संघटनेचे व पर्यायाने देश सेवेचे कार्य सातत्य पूर्वक व निस्पृहतेने करणाऱ्या महिलांना उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्याकडून विशेष सेवा सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. ८ मार्च हा जागतिक महिला दिन असतो. या विशेष दिवसाचे औचित्य साधून संघटनेसाठी गेली अनेक वर्षे सातत्याने कार्य करणाऱ्या स्वयंसेवी महिलांचा सन्मान करणे हे महिलांना प्रोत्साहन व नवी ऊर्जा देणारे ठरेल म्हणून हा विशेष कार्यक्रम ८ मार्चला कार्य व्यस्तता असल्याने २१ मार्च रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विजय जाधव, उप नियंत्रक स्वतः होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे मॅडम आणि ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ मॅडम या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच बालक मंदिर संस्थेचे ओक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कांचन इंगोले आणि संस्थेचे विश्वस्त रमेश गोरे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुण्या संध्या साळुंखे यांनी नागरी संरक्षण संघटनेचे आणि संघटनेसाठी कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवक महिलांचे खूपच कौतुक वाटते असे सांगुन संघटनेचे कार्य समाजासाठी फार मोलाचे आहे तसेच स्वयंसेविका आपल्या घरच्या जबाबदार्या सांभाळून निस्पृहता पूर्वक करत असलेल्या कामाचे फार महत्व आहे असे सांगितले तसेच ह्या सर्व विविध वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील महिलांना एका ध्येयाने प्रेरित कार्यासाठी च्या उत्साहाबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे विशेष अतिथी डॉ. अनिता जवंजाळ मॅडम ह्यांनी देखील महिलांचे कौतुक करताना आपण आपत्ती व्यवस्थापन क्षेत्राशीच् निगडित असल्याने नागरी संरक्षण संघटनेच्या स्वयंसेवकांसोबत कार्य केलेले असून त्यांची धडपड, जिद्द आणि शिस्तबद्ध कार्याबद्दल कौतुक केले आणि एकाच क्षेत्रात काम करत असल्याने शक्य असेल तिथे संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
उपनियंत्रक विजय जाधव यांनी नागरी संरक्षण संघटनेचे अनेक जिल्ह्यामध्ये ( नियुक्तीवर असताना ) काम केलेले असून ठाणे जिल्ह्यात काम करताना जास्त उत्साही व सकारात्मक लोकांसोबत काम करण्याचा अनुभव मिळत असून संघटनेत अजूनही सकारात्मक बदल घडवून ठाणे जिल्हा कायम अग्रेसर राहील यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन देवून सर्व स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या. तसेच सेवानिवृत्त वरीष्ठ सहाय्यक उपनियंत्रक शोनल मेहरोळे यांनी आपल्या सेवाकाळात जास्तीत जास्त कार्यकाल हा ठाणे जिल्ह्यातच सेवा केलेली असून आजही स्वयंसेवकांचा उत्साह पाहून छान वाटले तसेच अशा प्रकारचा महिलांचा सन्मान करणारा कार्यक्रम आपल्या 30 वर्षांच्या सेवाकाळात कधीही झालेला नसून ह्या कार्यक्रमाचे संकल्पना तसेच आयोजन व नियोजन करणार्या आणि त्या कार्यक्रमास सेवानिवृत्त महिला कर्मचारी यांना देखील आमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून आभार देखील मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिपाली बागूल आणि बिमल नथवाणी यांनी अतिशय सुरेखपणे केले. तर आभार प्रदर्शन दीपा घरत, सहाय्यक उप नियंत्रक यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन/ नियोजन आणि सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संघटनेचे चारही उप मुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवाणी ( क्षेत्र-१ ) , रमेश गोरे ( क्षेत्र- २ ), कमलेश श्रीवास्तव ( क्षेत्र- ३ ) आणि करमवीर सिंग भुर्जी ( क्षेत्र- ४ ) यांनी विशेष मेहनत घेतली. त्याचप्रमाणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पडद्यामागच्या सर्व कामाची जबाबदारी शकुंतला राय , हनुमान चौधरी, संजय मगर, डॉ. प्रकाश ठमके, बुद्धदास जाधव, अजित कारभारी आणि सगीर खान यांनी अतिशय कुशलतेने पार पडली.
तसेच कार्यक्रम स्थळाला शोभा आणण्यासाठी दिया केणे, लीना ढोणे, शमा लोकरे यांनी सुबक अशा रांगोळ्या काढून सजावट केली. तसेच सर्व मानसेवी अधिकारी आणि स्वयंसेवक यांनी देखील अतिशय उत्साहाने कार्यक्रम पार पाडण्यासाठी मदत केली.