ट्रकचे चाक रस्त्यात रुतल्याने वाहतूक विस्कळीत
दिवा \ आरती परब : दिव्यातील मुख्य रस्त्यांच्या दयनीय अवस्थेचा प्रत्यय गुरुवारी पुन्हा एकदा नागरिकांना आला. दिवा टर्निंग (छत्रपती शिवाजी महाराज चौक) परिसरात दुपारच्या सुमारास सामानाने गच्च भरलेल्या मोठ्या ट्रकचे चाक रस्त्यातील खड्यात रुतल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ वाहतूककोंडी निर्माण झाली.
दिवा टर्निंग ते दिवा आगासन दरम्यानचा सिमेंट काँक्रीट रस्ता लॉकडाऊन काळात तयार करण्यात आला होता. मात्र दिवा चौक ते दिवा स्टेशन हा महत्त्वाचा मार्ग अद्याप सिमेंट काँक्रिटचा न झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या ठिकाणी ट्रकचे चाक रुतले, त्या भागाखाली जुने व लहान गटार असल्याचे समोर आले. दिवा प्रभाग समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जागेच्या मालकाने रस्ता कायमस्वरूपी करण्यास परवानगी नाकारल्यामुळे तेथे तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली होती. पालिकेकडून वारंवार पाठपुरावा करूनही जागा मालक गटार साफसफाई व रस्त्याचे काम करण्यास परवानगी देत नसल्याने आजची परिस्थिती उद्भवली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी करत प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रशांत गावडे, सचिव, मनसे, दिवा शहर - दिव्यातील मुख्य रस्त्यावर एका ट्रक मुळे भगदाड पडणे ही दिवेकरांसाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. दिव्यात सगळ्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होता. पण सर्वात जास्त भ्रष्टाचार हा रस्त्याच्या कामात होताना दिसत आहे. दिव्यात पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलासाठी २२ इमारती तोडण्यात आल्या होत्या. पण त्या तोडक कारवाई नंतर ही जागा सपाट करून रस्ता बनवला गेला. तो बनवतानाच हे गटार बुजवून तो रस्ता नीट बनवणे गरजेचे होते. पण ते न करता वरचेवर काम केल्याने आज तो रस्ता खचला गेला.

