नालेसफाई मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे महापौरांचै निर्देश


पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठोस नियोजनाची सुरुवात

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामाचा सविस्तर आढावा गुरुवारी महापौर यांनी घेतला. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मार्च अखेरपासून मे अखेरपर्यंत शहरातील सर्व मोठे व लहान नाले पूर्णतः स्वच्छ करण्यात यावेत, जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना पाणी साचणे, दुर्गंधी किंवा आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागू नये, असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले.

कै. अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या बैठकीस उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत शहरातील दैनंदिन रस्ते साफसफाईची स्थिती, कचरा हस्तांतरण केंद्रांची कार्यपद्धती, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची देखभाल, बांधकाम व पाडकाम कचऱ्याची विल्हेवाट तसेच ‘स्वच्छ ठाणे व्हिजन’ उपक्रमाची सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

काही प्रभागांमध्ये सार्वजनिक शौचालयांची नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी निदर्शनास आल्याने महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले. शौचालयांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असावे, पाण्याच्या टाक्या रिकाम्या झाल्यास तात्काळ भराव्यात, तसेच दरवाजे, कडी-कोयंडे सुस्थितीत ठेवावेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. संबंधित स्वच्छता निरीक्षकांनी याबाबत विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.


ओला-सुका कचरा वर्गीकरणावर भर

शहरी भागात ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी झोपडपट्टी भागात हे प्रमाण कमी असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबवून स्त्रोतस्थळी कचरा वर्गीकरणाची सवय बळकट करावी, असे निर्देश देण्यात आले.

यांत्रिकी स्वच्छतेवर भर

सध्या शहरात दोन सत्रांत रस्ते साफसफाई केली जात असून १६५६ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. सहा वाहनांच्या माध्यमातून यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता केली जात आहे. तसेच ओला व सुका कचरा प्रकल्प, पूर्वप्रक्रिया केंद्रे आणि बांधकाम कचऱ्यावरील प्रक्रियेची माहितीही या वेळी सादर करण्यात आली.

यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेला अधिक गती देण्यासाठी प्रभागांतील अंतर्गत रस्त्यांची नियमित साफसफाई व व्यापक नियोजन करण्याच्या सूचनाही महापौरांनी बैठकीत दिल्या. पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणा सज्ज ठेवून ठाणेकरांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




Post a Comment

Previous Post Next Post