ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंची मुख्यमंत्री, आयुक्त आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार
दिवा,/ आरती परब : डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात सुवर्णा अविनाश सरोडे (वय २६) या गर्भवती महिलेचा सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी महानगरपालिका प्रशासन, डॉक्टरांची निष्काळजी, सेवा पुरवणारी बाह्यस्त्रोत एजन्सी आणि जबाबदार अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख दीपेश पुंडलीक म्हात्रे यांनी केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडे अधिकृत तक्रार करण्यात आली असून, तातडीने सुवर्णा सरोदे यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपायुक्त प्रसाद बोरकर समितीच्या प्राथमिक चौकशीत शास्त्रीनगर रुग्णालयातील दोन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर निष्काळजी ठरले असून, रुग्णालयासाठी डॉक्टर व नर्स पुरवणाऱ्या “मेसर्स एमके फॅसिलिटीस सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड” या बाह्यस्त्रोत एजन्सीची देखील जबाबदारी ठरते. त्यामुळे या एजन्सीवरही कठोर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी वैद्यकीय यंत्रणांवर अधिक नियंत्रण ठेवण्यात यावे, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी झोपी गेले आहेत!
या गंभीर घटनेवर स्थानिक लोकप्रतिनिधी पूर्णपणे गप्प आहेत. निवडणुका आल्या की हेच लोकप्रतिनिधी मतांसाठी घरोघरी फिरतात, पण निवडणुकीनंतर जनतेच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष करतात. डोंबिवली शहराची ही मोठी शोकांतिका आहे. स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवण्या ऐवजी लोकप्रतिनिधी झोप काढत आहेत, हे लाजिरवाणे आहे.
“सर्वसामान्य नागरिक सरकारी रुग्णालयांवर विश्वास ठेवून उपचारांसाठी जातात. मात्र, अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप महिलांचा जीव जात असेल, तर हे प्रशासनाचे अपयश आहे. याला जबाबदार असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
दीपेश पुंडलीक म्हात्रे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) -