कणकवलीतील ‘मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबीर’ यशस्वी




पालकमंत्री नितेश राणे यांची संकल्पना साकार

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिरा’ला तालुक्यातील ग्रामस्थ आणि रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभर चाललेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून शिबीर यशस्वी केले.


जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील दुर्गम भागातूनही ग्रामस्थ आणि रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.


या शिबिराचा शुभारंभ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आला. शिबिरादरम्यान एकूण ११३४ लाभार्थींना विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा देण्यात आली. यात हृदयरोग, शल्यचिकित्सा, पोटाचे विकार, स्त्रीरोग, कर्करोग, अस्थिरोग, बालरोग, बालअस्थिरोग, मूत्रविकार तसेच कान-नाक-घसा तज्ज्ञांचा समावेश होता.


तपासणीसाठी आलेल्या काही रुग्णांच्या गुंतागुंतीच्या गाठींच्या शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ करण्यात आल्या. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलीमा इनामदार यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.


शिबिरात दिवसभरात यूएसजी – १५२, सीटी स्कॅन – ६४, रक्त तपासण्या – ७५४, टूडी-इको – ११९, एक्स-रे – १ आणि ईसीजी – १२२ अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर गंभीर आजार आढळलेल्या रुग्णांवर ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय तसेच गरजेनुसार मुंबई–पुणे येथे पुढील उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.



Post a Comment

Previous Post Next Post