शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आढावा बैठकीत निर्देश 

नागपूर : नागपूर शहरात झालेल्या दंगलीत ३४ पोलीस जखमी झालेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ व संपत्तीचे नुकसान झाले आहे. नागपुरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा तसेच शहरात शांतता कायम रहावी, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत  आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. शांतता भंग करणाऱ्या दंगेखोरांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


शांतताप्रिय शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. या शहराला अशांत करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. औरंगजेबासंदर्भात दुपारी आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही समाजकटंकांनी सायंकाळी दंगा भडकवला. दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ कारवाई करुन दंगल आटोक्यात आणली. परंतु, यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ व संपत्तीचे नुकसान झाले आहे. पोलिसांवरही दगडफेक केल्यामुळे ३४ पोलीस जखमी झाले आहेत. अशा प्रकारच्या घटना शहराच्या कुठल्याही भागात घडणार नाहीत, यादृष्टीने पोलीस विभागाने सतर्क राहून कठोर कारवाई करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या. 

शहरात घडलेल्या घटनेसंदर्भात ११ पोलीस स्टेशनच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी १३ गुन्हे दाखल झाले असून १०४ आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये १२ विधी संघर्षित बालकांचा समावेश आहे. दंगलीत सहभागी असणाऱ्या दंगलखोरांना सीसीटीव्ही कॅमेरे, जनतेकडून प्राप्त व्हिडीओ क्लीपच्या आधारे शोधून कडक कारवाई करण्याच्या सूचना देखील या बैठकीत देण्यात आल्या. 


संचारबंदी टप्प्याटप्याने हटवणार

यावेळी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना सहआरोपी केले जातील. नुकसानीचे पंचनामे करून तीन दिवसात मदत दिली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले. दंगलीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, याची भरपाई दंगेखोरांकडून वसूल केली जाईल असे सांगत नागपूरची शांतता भंग होणार नाही याची दक्षता घेत संचारबंदी टप्प्याटप्याने हटवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 






Post a Comment

Previous Post Next Post