मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान सभेत घोषणा
मुंबई : वयाचे शंभर वर्षे शिल्पकलेत सक्रीय असलेले ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी आजपर्यंत राष्ट्रपुरूषांचे तसेच अनेक महान विभुतींचे पुतळे साकारले आहेत. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
महाराष्ट्र भूषण पूरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १२ मार्च रोजी पूरस्कार समितीची बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुरस्कारासाठी शिल्पकार सुतार यांची २०२४ च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पंचवीस लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प ज्येष्ठ शिल्पकार सुतार हेच साकारत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली.
ज्येष्ठ शिल्पकार सुतार जगद्विख्यात शिल्पकार आहेत. शंभर वर्षे वयाचे सुतार आजही शिल्पकलेत सक्रीय आहेत. त्यांनी राष्ट्रपुरूषांचे तसेच अनेक महान विभुतींचे पुतळे साकारले आहेत. जगभरातील अनेक शिल्पकृतींच्या उभारणीत सुतार यांचे योगदान राहीले आहे. या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार सुतार यांची निवड करताना विशेष आनंद होत असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.