अंबरनाथमधील गुर्जर उद्योग परिषदेत नवउद्योजकांना मार्गदर्शन

Maharashtra WebNews
0

 


अंबरनाथ/अशोक नाईक: गुर्जर समाजाच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या संकल्पनेतून गुर्जर उद्योग परिषद मोठ्या उत्साहात पार पडली.


या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट समाजातील उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांना एकत्र आणून उद्योगवाढीच्या संधी, सरकारी योजनांचा लाभ, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवसाय वृद्धीच्या संकल्पनांवर चर्चा करणे हे उद्दिष्ट ठेवून परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.




 गुर्जर उद्योग परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच एमआयडीसी 'आमा'संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास दिला. प्रसिद्ध उद्योगपती एस. आर. पाटील मुंबई, गोपाल पाटील पुणे, स्वाती पाटील आर्किटेक्ट ठाणे यांनी उद्योग क्षेत्रातील संधी आणि आपले अनुभव शेअर केले. याशिवाय अशोक पाटील, समाधान पाटील, पन्नालाल पाटील, पत्रकार हेमंत पाटील आणि बाबन पाटील यांनी उद्योगवाढीच्या संधींवर चर्चा करत समाजातील तरुणांना उद्योग क्षेत्रात उतरायला प्रोत्साहित केले. फार्मास्युटिकल उद्योगात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रिया पाटील,नाशिक यांनी औषध व्यवसायातील नवसंशोधन आणि उद्योगातील संधींवर आपले विचार मांडले.


कार्यक्रमाच्या विशेष सत्रात सीमा पवार यांनी नवीन उद्योग धोरणे, लघु व मध्यम उद्योगांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना तसेच महिलांसाठी असलेल्या व्यवसायवाढीच्या संधी याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे अनेक नवउद्योजकांना योग्य दिशा मिळाली.गुर्जर उद्योग परिषदेच्या माध्यमातून समाजातील उद्योजकतेला चालना मिळून नवउद्योजकांसाठी नवे मार्ग खुले होण्यास मदत होणार असल्याची आशा गुर्जर उद्योग परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.






Post a Comment

0Comments

Post a Comment (0)