आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची मागणी
अंबरनाथ / अशोक नाईक : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या शहराची ओळख प्राचीन शिवमंदिरमुळे झालेली आहे. सुमारे ९६५ वर्षांपूर्वी शिलाहार राजाने या मंदिराची निर्मिती केलेली आहे.अतिशय सुबक व दर्जेदार कलाविष्कार असलेल्या या प्राचीन शिवमंदिराला पाहण्यासाठी देशभरातून भक्त, भाविक, पर्यटक येत असतात. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथ शहरात महाजत्रा भरत असते.या जत्रेमध्ये देशभरातून पाच ते सहा लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या काशी-विश्वनाथ कॉरिडॉर धर्तीवर शिवमंदिर परिसराचा सुशोभीकरण विकास प्रकल्प कामानिमित्त कायापालट करण्याचे काम सुरू आहे.
या ठिकाणी पुजारी, हार फुल भंडार, रिक्षा संघटना, भक्त निवास तसेच इतर रूपाने मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार निर्मिती होणार आहे. अंबरनाथ हे नावं आणि शहराची ओळख ही प्राचीन शिवमंदिरातूनच निर्माण झाली असून ठाणे जिल्ह्याशी ह्या वास्तूची नाळ ही भक्तांशी भाविनक जुडली आहे.तरी आपण अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिर हे "श्री तिर्थक्षेत्र" म्हणून घोषित करावे. अशी विनंती आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना पत्राद्वारे केली.

