डोंबिवली एसटी आगाराची सुरक्षा वाऱ्यावर

 


पोलिसांनी केली पाहणी, सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना

डोंबिवली / शंकर जाधव :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन कल्याण डेपो अंतर्गत डोंबिवली एमआयडीसी येथील एसटी स्थानकात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने सरकार याकडे लक्ष देईल का? दिवसा सुरक्षा रक्षक नसल्याने पोलीस चौकी असावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. एसटी स्टँडची स्थानिक पोलिसांनी पाहणी करून ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची गरज आहे, तिकडे लावावे असे सांगण्यात आले.


  या एसटी स्टँडमधून डोंबिवलीकर प्रवास करत असतात. मात्र या  एस. टी. स्टँडमध्ये सुरक्षाच नसल्याचे दिसते. रात्र पाळीवर एका सुरक्षरक्षक असतो तोही नावापुरताच असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. कल्याण व विठ्ठवाडी आगारातून एसटी येत असते. या आगारात पिण्याची सोय नसल्याने प्रवाशी वर्ग पुरते वैतागले आहेत.तिकीट काढण्याकरता दोन कर्मचारी असतात. आगाराचा परिसर मोठा असल्याने नागरिकांची सतत वर्दळ सुरु असते. हाकेच्या अंतरावर टिळकनगर पोलीस ठाणे असल्याने तशी भीती वाटत नाही असे कर्मचारी म्हणतात.  



    पुण्यातील घटनेनंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळ जागे झाले नसून डोंबिवलीतील बस स्टॅण्डमधील सुरक्षा रामभरोसेच अशी स्थिती दिसते. कल्याण डेपो अंतर्गत डोंबिवली एमआयडीसी स्थानकातून दिवसभरातून सुमारे ७० बसेस धावतात. पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आदी जिल्ह्यातून बसेस ये-जा करीत असतात. डोंबिवली डेपो नसल्याने डोंबिवलीकर प्रवाशांना इतर डेपोच्या बसेसवर अवलंबून राहावे लागत. डोंबिवली स्थानकात येणाऱ्या बसेस इतर डेपोतून येणार असल्याने प्रवाश्यांना तासनतास बस स्टॅण्ड मध्ये बसून एसटीची वाट पाहावी लागते. महिलांसाठी जरी स्वच्छतागृह म्हणून जागा असली तरी त्याचा उपयोग करता येत नाही कारण तेथील परिस्थिती भयानक आहे.


या आगाराची पोलिसांनी पाहणी करून सीसीटीव्ही कॅमेरात लावण्याची जागा पाहिली. दिवसरात महामंडळाच्या सुमारे ५०-५५ बसेस डोंबिवली स्थानकातून ये - जा करतात. कोकणात फक्त रत्नागिरी, महाड, दापोली, अलिबाग, मुरुड आदी पुरतीच डोंबिवली स्थानकातून सेवा मिळत असून तळ कोकणसाठी बस धावत नाही. पूर्वी डोंबिवली मार्ग तळ कोकणसाठी बस होती परंतु तो मार्ग आता बंद झाला आहे. कोकणातील राजापूर, देवगड, लांजा, कणकवली मार्गावर बस मागणी डोंबिवलीकर करीत असतात. पावसाळा आणि उन्हापासून बचाव व्हावा म्हणून शेड बांधण्यात आली आहे इतपतच हा बसस्थानक असल्याचे प्रवासी सांगतात.  कोकणात सण-उत्सावाला जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. त्या दरम्यान फक्त जादा बसेस सोडण्यावर महामंडळाचा भर असतो, मात्र इतर वेळा या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. 




 डोंबिवली एसटी बसस्थानकाबाबत येथील वाहतूक नियंत्रण कर्मचारी मनाली मोरे यांना विचारले असता भिवंडी, विजापूर, कल्याण, विठ्ठलवाडी, लातूर, रत्नागिरी, इस्लामपूर, सातारा अशा बाहेरगावी मुख्यतः जाणाऱ्या गाड्यांच्या वेळा रात्रीच्या आहेत. येथे परिसरात काही प्रमाणात लाईट व्यवस्था नाही. एक सुरक्षा कर्मचारी आहे पण त्याचा कितपत उपयोग होईल हे सांगता येत नाही. मी सुद्धा घरातून पिण्यासाठी पाणी आणते. येथे पाण्याची सोय नाही, मी एकटीच महिला कर्मचारी काम करीत असून मी दरवाजा बंद करून काम करते. कारण माझ्या वेळेला सुरक्षा रक्षक नाही. यामुळे या बस स्थानकात सर्वच काही रामभरोसे आहे, असे यावेळी प्रवाशांनी सांगितले.


वाहतूक अधीक्षक गोसावी यांना विचारले असता ते म्हणाले, पोलिसांनी  या आगाराची पाहणी केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याबाबत चर्चा झाली. या आगारात रात्री सव्वा दहा वाजता शेवटची एसटी येते. रात्रपाळीवर एक सुरक्षा रक्षक आहे.




Post a Comment

Previous Post Next Post