महानगर गॅसपुरवठा लवकरच सुरू न झाल्यास आंदोलन

Maharashtra WebNews
0

 



दिपेश म्हात्रे यांचा महानगर गॅस अधिकाऱ्यांना इशारा!

दिवा / आरती परब :  डोंबिवली पश्चिम येथे महानगर गॅसच्या वतीने गॅसपुरवठा सुरू करण्यास प्रचंड विलंब होत आहे. इमारतींमध्ये गॅस डिस्ट्रीब्यूशन लाईन टाकून दीड वर्षाचा कालावधी लोटला असला तरी अद्याप नागरिकांना गॅस मिळालेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

आज नागरिकांच्या मागणीवरून महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करण्यात आली. महानगर गॅसने तातडीने उपाययोजना करून पुढील दोन महिन्यांत गॅसपुरवठा सुरू करावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा अधिकाऱ्यांना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आला.

डोंबिवली पश्चिम भागातील महिलांना कामावर असताना घरी आलेला गॅस सिलेंडर घेता येत नसल्याने त्यांनी महानगर गॅस एजन्सीकडे पाईप गॅसची मागणी केली होती. त्यासाठी पण महिलांना गॅस एजन्सीकडे तगादा लावावा लागत असेल तर त्यांनी कामे कशी करावीत. हा असा महत्त्वाचा प्रश्न घेऊन जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे कडे जाऊन यात लक्ष घालण्याची महिलांनी विनंती केली. तर गॅस एजन्सीकडे महिलांनी नाराजी व्यक्त केली. 



मी सभापती असताना डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांचे काम (दीनदयाल रोड व महात्मा गांधी रोड) सुरू होते. त्यावेळी दूरदृष्टी ठेवून मी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी महानगर गॅसची डिस्ट्रीब्यूशन लाईन टाकण्याचे नियोजन केले होते. मात्र, दीड वर्षांपासून नागरिकांना गॅस न मिळणे ही गंभीर बाब आहे. यावेळी डोंबिवली पश्चिमचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महानगर गॅसने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल.

- दिपेश पुंडलीक म्हात्रे,
शिवसेना जिल्हाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)