कल्याण/शंकर जाधव : यावर्षीच्या महिला दिनी नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने महिला दिन साजरा करण्याऐवजी जुन्या व नव्याची सांगड घालत महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या संकल्पनेनुसार काल सायंकाळी महिला दिनाचा कार्यक्रम कल्याण पश्चिम येथील सिटी पार्कच्या खुल्या व निसर्गरम्य वातावरणात मोठ्या जल्लोषात व उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.
तरुणाईच्या तुडुंब गर्दीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील वसंत व्हॅली येथील कर्मचारी वर्गाने झुंबा व योगाचे फ्युजन नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली, तर खडेगोळवली येथील वैद्यकीय विभागाच्या कर्मचारी वर्गाने स्त्री जीवनातील विविध टप्प्यांचे सादरीकरण आपल्या नृत्याच्या माध्यमातून केले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अखेरीस गोंधळाच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा आदिशक्तीचा जागर करण्यात आला. यावेळी पियुष अकॅडमी आणि कल्याण मम्मीज ग्रुप यांनीही सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुंदर सादरीकरण केले.
महिला दिनाच्या या कार्यक्रमात प्रथमच आई आणि मुलीच्या नात्याचे सौंदर्य, प्रेम आणि भावनेला अनोखी अभिव्यक्ती देण्यासाठी " आई आणि लेक" अशा रॅम्प वॉकचे आयोजन करण्यात आले होते, परंतु या रॅम्प वॉकमध्ये आई,तिची लेक इतकेच नव्हे तर ७२ वर्षाच्या आजीबाईंनी देखील आपल्या नातीसमवेत रॅम्प वॉक करून प्रेक्षकांना आदिम स्त्रीशक्तीचे, प्रेरणेचे मनोहारी दर्शन घडविले.
या रॅम्प वॉकमध्ये सहभागी महिलांबरोबरच, महापालिका शहर अभियंता अनिता परदेशी महिला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे कुलकर्णी व इतर महिला अधिकाऱ्यांनी देखील सहभाग घेतला . इतकेच नव्हे तर महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी आपल्या छोट्या लेकीसह आणि सुविद्य सासुबाईसह रॅम्प वॉक करत कार्यक्रमाचा आनंद लुटला.
याच कार्यक्रमात कल्याण आयएमएच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा इटकर आणि प्रख्यात गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. अश्विन कक्कर यांनी उपस्थित महिलांना आरोग्य विषयक समस्यांबाबत मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व देखील समजावून सांगितले. महिलांसाठी यावेळी रँडम शुगर, बोन डेन्सिटी हिमोग्लोबिन आदी चाचण्या निशुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
महापालिका क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते सत्कार करून कार्यक्रमाची सांगता झाली. सायंकाळच्या वेळी आयोजिलेल्या या कार्यक्रमास महिलावर्गाने प्रचंड संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रम स्थळी निशुल्क उपलब्ध असलेल्या नेल आर्ट आणि मेहंदीच्या स्टॉल्स भवताली तरुणाईचा गराडा दिसून येत होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिका व सिटी पार्क मॅनेजमेंटचे विजय इंगळे यांच्यामार्फत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना शेटे यांनी आणि रॅम्प वॉकचे नियोजन डॉ. अर्चना सोमाणी यांनी केले.