गडचिरोलीतील सर्व खाणी बंद न केल्यास आंदोलन

 


काॅ. अमोल मारकवार यांचा इशारा

जल-जंगल-जमिनीच्या रक्षणासाठी ग्रामसभांचा एल्गार !

गर्देवाडा / शेखर धोंगडे : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व खाणी त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामसभांनी गेली अनेक वर्षांपासून  आंदोलन पुकारले असून सरकारने तातडीने त्यांच्या मागण्या पूर्ण करत जिल्ह्यातील सर्व लोहखाणी बंद कराव्यात, अन्यथा याविरोधात ग्रामसभांचा मोठा एल्गार उभारला जाईल, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांनी दिला आहे.  


सुरजागड परिसरात दमकोंडी पाहाड (गर्देवाडा ग्रामपंचायत हद्द) येथे पारंपरिक निसर्ग पूजेच्या निमित्ताने हजारो आदिवासी, वननिवासी आणि ग्रामसभा प्रतिनिधी एकत्र आले होते. यावेळी दमकोंडवाही येथील पहाडावर पारंपरीक पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार  करण्यात आला.


आमच्या पूर्वजांनी जपलेले हे जंगल आम्ही कधीही नष्ट होऊ देणार नाही. जंगल म्हणजे आमचा प्राण, आमचे जीवन, आमची संस्कृती! कोणत्याही परिस्थितीत जल, जंगल, जमीन लुटू दिली जाणार नाही असा ठाम इशारा ग्रामसभांनी दिला आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक, ग्रामसभा, कम्युनिस्ट - रिपब्लिकन पक्ष व निसर्गप्रेमी एकवटणार असल्याची घोषणा करण्यात आली. 


भविष्यातील जल, जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामसभा, महाग्रामसभा, पर्यावरणप्रेमी, नागरिक, कम्युनिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन तीव्र विरोध करतील. सरकारने आणि कंपन्यांनी जर गडचिरोलीतील खाणकाम त्वरित बंद केले नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल आणि संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरतील अशी ठाम भूमिका ग्रामसभांनी घेतली आहे.


सदर वार्षिक पूजा संमेलनादरम्यान अनेक ठराव करण्यात आले. यावेळी सुरजागड पारंपरिक इलाख्याचे प्रमुख सैनू गोटा, शेकापचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, भाकपचे तालुका सचिव काॅ. सचिन मोतकुरवार, काॅ. सुरज जक्कुलवार, किसान सभेचे तालुका अध्यक्ष रमेश कवडो, पत्रकार हेमंत डोर्लीकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post