ठाकरे गटाची मागणी
दिवा / आरती परब : दिवा शहर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येत असून दिव्याची लोकसंख्या पाच ते आठ लाखाच्यावर आहे. सुरक्षेच्या कारणास्तव येथे मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा चौकी असून सदर पोलीस स्टेशनला पंचवीस ते तीस लोकांचा अपुरा असा स्टाफ असल्यामुळे दिव्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दिव्यातील लोकांना तक्रार दाखल करायची असल्यास त्यांना दहा किलोमीटर मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जावे लागते. यासाठी दिव्यात पोलीस स्टेशनच्या मागणीसाठी कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी मागणीचे निवेदन ठाणे पोलीस आयुक्तांना दिले.
चरस, गांजा, हकीम यासारख्या व्यसनाला येथील तरुण मंडळी आधीन होताना दिसत आहेत. महिलांच्या तक्रारी सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. चोरी, दरोडे यासारखे प्रकार दिव्यात सरास्सपणे होताना दिसत आहेत. पंचवीस हजार लोकसंख्येच्या मागे एक पोलीस अशी दैन्य अवस्था दिवा पोलीस चौकीचे आहे. दिव्यातील लोकांना तक्रार करायची असल्यास त्यांना दहा किलोमीटर मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जावे लागते. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दिवावासी गेले कित्येक वर्ष दिवा पोलीस स्टेशन व्हावे म्हणून वारंवार मागणी करत आहेत. परंतु जागेचा अभाव सांगून ही मागणी वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे. तरी ठाणे महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकारी ठाणे यांच्या बरोबर चर्चा करून दिवा विभागातील सरकारी जागा आपण पोलीस स्टेशन साठी मागणी करावी व तेथे तात्काळ दिव्यासाठी सुसज्ज असे पोलीस स्टेशन करावे, असे आशियाचे पत्र कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, विजय देसाई, शहर प्रमुख सचिन पाटील, प्रकाश तेलगोटे, विजय कदम, लहू चाळके, रवींद्र सुर्वे, कलवा शहर संघटिका कल्पना कवले, मुंब्रा शहर संघटिका शाहीन घडीआली, उपशहर प्रमुख अनिश कुरेशी आदी उपस्थित होते
