लिव्ह इन'चा आसरा देणाऱ्यानाही अटक
अंबरनाथ/अशोक नाईक : अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागाचा आसरा घेऊन बेकायदेशीर वास्तव्याला असलेल्या दोन बांगलादेशी महिलांसह त्यांना 'लिव्ह इन' रिलेशनशिपमध्ये आसरा देणाऱ्या दोन पुरुषांनाही उल्हासनगर गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांना मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील आडीवली-ढोकळी गावात ३६ वर्षीय फर्जाना शिरामुल शेख ही बांगलादेशी महिला वास्तव्यास होती. २३ वर्षांपूर्वी भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश करून ताहीर मुनीर अहमद खान यांच्यासोबत ती 'लिव्ह इन' रिलेशनमध्ये राहत होती. तसेच भिंती उर्फ प्रियानूर इस्लाम अख्तर ही २४ वर्षे तरुणी मागील एक वर्षापासून बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्याला होती. ती सुद्धा आडीवली- ढोकळी परिसरात गणेशचंद्र दास यांच्यासोबत 'लिव्ह इन' रिलेशनशिप मध्ये राहत होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर गुन्हे शाखेने या दोन्ही बांगलादेशी महिलांसह त्यांच्यासोबत 'लिव्ह इन' रिलेशनमध्ये राहून बांगलादेशीना आश्रय देणाऱ्या दोन पुरुषांनाही अटक करण्यात आली आहे. या विरोधात पारपत्र अधिनियम,विदेशी व्यक्ती अधिनियम यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना मानपाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.