मुंबई : शिवसेनेच्या स्थापनेपासून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करणारे परळ-भोईवाडा परिसरातील जुनेजाणते शिवसैनिक विश्वनाथ (बुवा) खताते, विजय कलगुटकर आणि काशीताई कोळी यांच्यासह २५ ज्येष्ठ शिवसैनिकांनी शिवसेना ( एकनाथ शिंदे) पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात आदरपूर्वक स्वागत करून पक्षासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून कार्यरत रहावे अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
दादर परळमध्ये शिवसेना रुजवण्यात विश्वनाथ (बुवा) खताते यांचे मोठे योगदान होते. त्यांच्यासोबत विजय कलगुटकर आणि काशीताई कोळी यांनीही बाळासाहेबांसोबत काम केले होते. मुंबईतील रखडलेले पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांत मार्गी लावल्यामुळे मुंबईतील मराठी कुटुंबांना हक्काची घरे मिळणार असून पक्षाच्या याच गतिमान कामाने प्रभावित होऊन बाळासाहेबांचे खरे विचार पुढे नेणाऱ्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे या ज्येष्ठ शिवसैनिकांनी यावेळी सांगितले.
त्यासोबतच आंबेडकरी चळवळीचे नेते आणि राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवी गरूड आणि भिवंडी तालुक्यातील कोनगाव ग्रामपंचायतीचे सदस्य महेंद्र भगत, प्रदोष म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी शिवसेना सचिव वैभव थोरात, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

