डोंबिवली \ शंकर जाधव : कल्याण येथे १३ एप्रिल रोजी पार पडलेल्या जिल्हा स्तरीय पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस आणि डेड लिफ्ट स्पर्धेत ६३ वर्षीय अशोक दिक्षित यांनी तीन सुवर्ण पदके पटकविली. तिन्ही स्पर्धा मध्ये स्ट्राँग मॅन हा किताबही मिळविला. या तीन पदकांनी अशोक दिक्षित यांनी सुवर्ण पदकांची सेंच्युरी पूर्ण केली. त्यांना आत्तापर्यंत एकूण १०२ सुवर्ण पदके २३ रौप्य पदके आणि २७ कांस्य पदके अशी एकूण १८९ स्पर्धांमध्ये १५२ पदके मिळाली आहेत. या सर्व पदकांचे श्रेय त्यांनी नमस्कार मंडळाचे प्रशिक्षक श्रीबास गोस्वामी यांच्या बहुमोल मार्गदर्शनाला, तसेच मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व सहकारी खेळाडू यांनी दिलेल्या उत्तम साथीला तसेच घरची आघाडी सांभाळणाऱ्या पत्नी अनघा दीक्षित यांना दिली आहे. ६३ व्या वर्षीही अशोक दिक्षित यांची अजून ११ स्पर्धा खेळून एकूण २०० स्पर्धा पूर्ण करण्याचा मानस आहे.
अशोक दिक्षित यांचे शालेय शिक्षण सुभेदारवाडा कल्याण येथे तर महाविद्यालयीन शिक्षण मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स येथे m.com पर्यंत झाले. १९८१ पासून त्यांनी नमस्कार मंडळ कल्याण येथे वेंटलीफ्टींग चा सराव सुरु केला. त्याच वर्षी आंतर विद्यालयीन स्पर्धेत रजत पदक. १९८९ पासून त्यांनी पॉवरलिफ्टिंग ह्या खेळास सुरुवात केली. त्यांनी आज पर्यंत अनेक जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. १९८३ साली कॅनरा बँकेत नोकरीस सुरवात करुन पुढे अनेक वर्ष कॅनरा बँकेचे विविध स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. २००२ साली अर्जेंटिना येथे वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. सदर स्पर्धेत १ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकांची कमाई भारतासाठी केली आहे. २००७ साली लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये वडिल आणि मुलगी सलग सहा वेळा स्पर्धेत भाग घेणारे पहिलेच म्हणून नोंद झाली आहे. अशोक दिक्षित व अनुजा दिक्षित यांना कल्याण रत्न पुरस्कार तसेच चित्पावन ब्राह्मण संघ कल्याणतर्फे पुरस्कार प्राप्त झाला आहे .वयाच्या ६३ व्या वर्षीही स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची जिद्द आहे. त्यांनी अनेक वर्षे पंच म्हणून पण कामगिरी केली आहे.