ग्रामीण भागातील समस्या तातडीने सोडवा


उद्योगमंत्र्याच्या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना निर्देश

डोंबिवली \  शंकर जाधव :  कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या भागाला तीव्र पाणी टंचाई भेडसावत असून या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी पुन्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह एमआयडीसी अधिकार्याची भेट घेतली. यावेळी पाणी प्रश्न, अमृत योजना केव्हा मार्गी लागणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या भागातील नागरिकांना मागील अनेक वर्षापासून पाणी टंचाईने ग्रासले असून हा पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार असा प्रश्न यावेळी उद्योग मंत्र्यांनी थेट एमआयडीसीचे मुख्य अधिकारी पी वेलारासू यांना उपस्थित करत समस्याचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. 

मागील सहा महिन्यात आमदार मोरे यांनी ग्रामीण भागातील प्रश्नाबाबत घेतलेली ही चौथी बैठक आहे. ग्रामीण भागातील समस्याबाबत आमदार मोरे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासनाचे आणि एमआयडीसीचे अधिकारी एकत्रित दौरा करणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.






आमदार राजेश मोरे यांनी या बैठकीत सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या  जागेची मागणी केली. याबाबत एमआयडीसीने अनुकुलता दाखवत ही जागा श्रीक्षेत्र पिंपळेश्वर ट्रस्टला देण्याकरिता महसूल विभागाबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तर गावातील पाणी पुरवठा योजना तातडीने कार्यान्वित केली जावी, २७ गावांना वाढीव पाण्याचा कोटा देण्याबाबत तसेच पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना अधिकार्यांना देण्यात आल्या. 


  पलावा , निळजे लोढा , देसलेपाडा लोढा परिसरातील नागरिकांना एम आयडीसी कडून धाडली जाणारी पाणी बिले निवासी पद्धतीने आकारण्यासाठी त्वरित अंमलबजावणी करा असे निर्देश देण्यात आले. यावेळी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, भरत भोईर , डोंबिवली शहर सचिव तथा विद्यानसभा क्षेत्रप्रमुख संतोष  चव्हाण, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक बंडू पाटील, गणेश जेपाल, श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मोहन पाटील , माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील, अरुण पाटील , सचिन म्हात्रे , युवा सेना सागर जेधे, संपर्क प्रमुख विवेक खामकर, उपतालुकाप्रमुख गजानन पाटील,अमोल भोगले, राहुल गणपुले, विभागप्रमुख भरत काळू भोईर , सुभाष पाटील , सतरपाल सिंग , खिडकाळीचे सुनील पवार , सतीश मोडक यांच्यासह पालिकेचे तसेच एम आयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.






Post a Comment

Previous Post Next Post